असे काय घडले, ज्यामुळे नितीश कुमार पुन्हा भाजपसाेबत गेले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 06:50 AM2024-01-29T06:50:18+5:302024-01-29T06:52:02+5:30

Nitish Kumar: प्राण गेले तरी चालतील, मात्र भाजपसाेबत पुन्हा जाणे मान्य नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. या वक्तव्याला अजून एक वर्षही पूर्ण व्हायचे आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली.

What happened that made Nitish Kumar go back to BJP? | असे काय घडले, ज्यामुळे नितीश कुमार पुन्हा भाजपसाेबत गेले?

असे काय घडले, ज्यामुळे नितीश कुमार पुन्हा भाजपसाेबत गेले?

]पाटणा : प्राण गेले तरी चालतील, मात्र भाजपसाेबत पुन्हा जाणे मान्य नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. या वक्तव्याला अजून एक वर्षही पूर्ण व्हायचे आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून अशा घडामाेडींबाबत जाेरदार चर्चा सुरू हाेती.

 इंडिया आघाडीत ते खूश नव्हते. तसेच पक्षात फुटीची भीती, ही दाेन मुख्य कारणे नितीश कुमारांच्या पुन्हा भाजपसाेबत जाण्यामागे बाेलली जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले हाेते आणि नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले हाेते. मात्र, दीड वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीसाेबत महाआघाडीत सहभागी हाेत नितीश कुमार यांनी सरकार स्थापन केले. ही आघाडी पुन्हा एकदा नितीशकुमार यांनी ताेडली. जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने आयाेजित भाेजन समारंभात ते पंतप्रधान नरेंद्र माेदींना भेटले आणि तेथून त्यांची भूमिका बदलताना पाहायला मिळाली.

कशामुळे पुन्हा एनडीएमध्ये वापसी?
लाेकसभेच्या आगामी निवडणुकीत अपेक्षित यश मिळणार नाही, असे पक्षातील नेत्यांना वाटत हाेते. गेल्या निवडणुकीत जेडीयूचे १६ खासदार निवडून गेले हाेते. यावेळी तेवढे यश मिळू शकणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच जागावाटपामध्ये जेडीयूच्या वाट्याला किती जागा मिळतील, याचीही खात्री नव्हती. 

पक्षफुटीची भीती
जेडीयूचे माजी अध्यक्ष राजीव रंजन सिंह यांना वगळता पक्षातील बहुतांश ज्येष्ठ नेते भाजपसाेबत युती करण्याच्या बाजूने हाेते. जेडीयूचे किमान ७-८ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लाेकसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात फूट पडण्याची भीती हाेती. 

‘इंडिया’ आघाडीत अपेक्षाभंग?
विराेधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन करण्यात नितीश कुमार यांची प्रमुख भूमिका हाेती. विराेधी पक्षांची पहिली बैठक त्यांनीच पाटण्यात आयाेजित केली हाेती. मात्र, इंडिया आघाडीत त्यांना अपेक्षित महत्त्व न मिळाल्याने ते नाराज हाेते, असे सूत्रांचे 
म्हणणे आहे. 

तेजस्वी यांच्यासाठी लालुंचा वाढता दबाव
बिहारमध्ये घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाचे श्रेय आरजेडी घेण्याचा प्रयत्न करीत हाेती. त्यातच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी लालूप्रसाद यादव यांचा नितीश कुमार यांच्यावर दबाव वाढत हाेता.

Web Title: What happened that made Nitish Kumar go back to BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.