लोकसभेमध्ये सकाळपासून विरोधी पक्षांनी घातलेल्या गदारोळानंतर अखेर आज दुपारी २ वाजल्यापासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला सुरुवात झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला सुरुवात केली असून, यादरम्यान, त्यांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षाबाबत महत्त्वपूर्ण माहिती सभागृहाला दिली. भारतीय सैन्यदलांनी ६-७ मेच्या रात्री भारतीय सैन्यदलांनी राबवलेलं ऑपरेशन सिंदूर ही एक ऐतिहासिक कारवाई असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. भारताने केवळ पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना लक्ष्य करून ही कारवाई केली. तसेत त्यामध्ये सुमारे १०० दहशतवादी, त्यांच्ये ट्रेनर आणि हँडलर मारले गेले अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिली.
लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला सुरुवात करताना राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्याचं कौतुक केलं. ते म्हणाले की, पहलगामधमध्ये दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली होती. पहलगाम हल्ला हा अमानवीयतेचं मोठं उदाहरण आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांना निर्णायक कारवाईची सूट दिली. त्यानंतर भारतीय सैन्यदलाने ६-७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर ही ऐतिहासिक कारवाई केली. यादरम्यान, आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. सैन्यदलांनी आमच्या माता-भगिनींच्या पुसलेल्या कुंकवाचा बदला घेतला. मी खूप जपून बोलतोय. या कारवाईमध्ये १०० हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे हँडलर मारले गेले. मृतांची संख्या ही अधिक असून, शकते, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, ही कारवाई आगळीक करणारी नव्हती. मात्र पाकिस्तानने या कारवाईनंतर आमच्या सैनिकी केंद्रांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही हे हल्ले उधळून लावले. तसेच पाकिस्तानकडून झालेल्या या आगळिकीला आम्ही अगदी तोलून मापून प्रत्युत्तर दिले. आमची संपूर्ण कारवाई स्वसंरक्षणाची होती. पाकिस्तानने हल्ले करताना क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या हत्यारांचा वापर केला. आमचे सैनिकी तळ त्यांच्या निशाण्यावर होते. मात्र आमच्या संरक्षण यंत्रणेने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी हे हल्ले निष्फळ ठरवले. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना आमच्याकडून झालेली कारवाई ही साहसी आणि प्रभावी होती. तसेच या मोहिमेला आमच्या लष्कराने यशस्वीपणे पार पाडले.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरला स्थगित करण्याबाबत विचारण्यात येत असलेल्या प्रश्नालाही राजनाथ सिंह यांनी यावेळी उत्तर दिलं. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा पाकिस्तानने अनेक वर्षांपासून पोसलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना नष्ट करणे हा होता. त्यामुळे आमच्या सैन्य दलांनी केवळ भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांनाच लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश हा युद्धाला सुरुवात करण्याचा नव्हता. दरम्यान, १० मे रोजी सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाईतळांवरील धावपट्ट्यांवर मोठा हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानने पराभव मान्य करून युद्धविरामासाठी विनवणी सुरू केली. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर हे सध्या केवळ स्थगित करण्यात आलं आहे. आता पाकिस्तानने पुन्हा काही आगळीक केली तर ही कारवाई पुन्हा सुरू केली जाईल.