शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या घरावर ईडीचा छापा; 40 लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 11:04 IST2024-03-23T11:03:29+5:302024-03-23T11:04:20+5:30
Chandra Nath Sinha And ED : पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला असून 40 लाखांची रोकड जप्त केली आहे.

फोटो - आजतक
पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला असून 40 लाखांची रोकड जप्त केली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पैसे नेमके कुठून आले हे मंत्री सांगू शकलेले नाहीत. पुरावे गोळा करण्यासाठी ईडीने त्यांचा मोबाईलही जप्त केला आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी शुक्रवारी ईडीने मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या बोलपूर येथील निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकले.
जवळपास 13 तास चाललेली छापेमारी आणि चौकशी रात्री 10.30 च्या सुमारास संपली. ईडीचे पथक शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास चंद्रनाथ सिन्हा यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने टीएमसी युथ विंगचे नेते कुंतल घोष यांच्याकडून एक रजिस्टर जप्त केले आहे. त्या रजिस्टरमधून त्यांना चंद्र नाथ सिन्हा हे नाव मिळालं. कुंतल घोष यांना यापूर्वी शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने अटक केली होती.
ईडीने बुधवारी बिझनेसमन प्रसन्न रॉय यांना कोलकाता येथील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये चौकशीसाठी बोलावले. 11 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. शिक्षक भरती घोटाळ्यात माजी शिक्षणमंत्र्यांसह उमेदवार आणि अनेक नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. गेल्या वर्षी प्रसन्ना यांना सीबीआयने अटक केली होती मात्र त्यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
कोलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, ईडी आणि सीबीआय या दोन्ही संस्था शिक्षक भरतीबाबत चौकशी करत आहेत. तपासादरम्यान प्रसन्न रॉय यांचे नाव पुढे आले, त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कोलकाता येथील चार्टर्ड अकाउंटंट, व्यापारी आणि इतरांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. याच प्रकरणात आरोपी माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते आणि राज्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी तुरुंगात आहेत.