"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 17:13 IST2025-11-06T17:12:04+5:302025-11-06T17:13:27+5:30
तृणमूल काँग्रेसच्या आमदार असीमा पात्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

फोटो - ndtv.in
पश्चिम बंगालमध्ये SIR वरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस SIR ला विरोध करत आहे. विविध ठिकाणी निदर्शनं होत आहेत. याच दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या आमदार असीमा पात्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या भाजपा नेत्यांना झाडांना बांधण्याबद्दल बोलत आहेत.
एका सार्वजनिक रॅलीदरम्यान, असीमा पात्रा यांनी भाजपा नेत्यांना उघडपणे इशारा देत लोकांना सांगितलं की, "चुचुरा मतदारांची नावं वगळणाऱ्या बंगालमधील सर्व भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा, कोणालाही सोडू नका." हुगळी जिल्ह्यातील चुचुरा मोरे येथे आमदार असित मजुमदार यांच्या नेतृत्वाखालील एका सार्वजनिक रॅलीत हे विधान केलं आहे.
SIR प्रक्रियेचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये धनियाखालीच्या आमदार असीमा पात्रा पुढे म्हणाल्या, "मी चुचुरातील प्रत्येक नेत्याला सांगेन की, जर तुम्हाला शहर ब्लॉकमध्ये भाजपा नेते दिसले तर त्यांना ताबडतोब झाडाला बांधा. ते बंगालमधील लोकांची नावे काढून टाकू इच्छितात."
तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपा राज्य समितीचे सदस्य स्वपन पाल म्हणाले, "धनियाखालीचे आमदार भाजपा नेत्यांना झाडाला बांधण्याचा आदेश देत आहेत. बंगालमध्ये लोकशाहीचा त्याग करण्यात आला आहे का? येथे तालिबान राजवट आहे."
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर मतदार यादीतून नावं काढून टाकल्याचा आरोप करणारी विधानं करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकांना आवाहन केलं होतं की, जर भाजपा नेते नागरिकांची नावं काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना धडा शिकवला पाहिजे.