हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:35 IST2025-12-08T13:34:50+5:302025-12-08T13:35:48+5:30
या मशिदीच्या पायाभरणीमागे ममता बॅनर्जी यांचाच हात असल्याचे भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे...

हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात 'बाबरी मशीद' नावाने मशीद बांधण्याच्या मुद्द्यावरून जबरदस्त राजकारण सुरू झाले आहे. या मशिदीची पायाभरणीही करण्यात आली आहे. यावरून आता भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. या मशिदीच्या पायाभरणीमागे ममता बॅनर्जी यांचाच हात असल्याचे भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी या मशिदीची पायाभरणी केली. मात्र, यामागे ममता बॅनर्जी यांचाच हात असल्याचा दावा भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला आहे. सिंह म्हणाले, "हुमायूं कबीर यांनी नव्हे, तर ममता बॅनर्जींनी यांनीच ही पायाभरणी केली आहे. त्या केवळ नाटक करत आहेत आणि आपल्या नेत्यांकडून याविरोधात वक्तव्ये करवून घेत आहेत."
गिरिराज सिंह पुढे म्हणाले, "बंगालमध्ये हिंदू-मुस्लीम विभाजन करण्याचा ममता बॅनर्जी यांचा छुपा अजेंडा आहे. त्या हुमायूं कबीर यांच्या माध्यमातून 'बाबरी मशीद' हा हिडन एजेंडा घेऊन आल्या आहेत." एवढेच नाही तर, सिंह यांनी याला 'सुनियोजित रणनीती', म्हटले आहे. याचा विरोध केवळ बंगालमध्येच नाही तर देशभरात होत आहे. याची शिक्षा ममता बॅनर्जींना यांनाच भोगावी लागेल, असेही गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.
दुसऱ्याबाजूला, टीएमसीतून निलंबित झाल्यानंतर हुमायूं कबीर आता नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, यासंदर्भात ते 22 डिसेंबरला मोठी घोषणा करू शकतात.
दरम्यान, सिंह यांनी 'वंदे मातरम्' मुद्द्यावरही भाष्य केले. 'वंदे मातरम्'ची 150 वी जयंती आहे. हे 'स्वातंत्र्य गीत' बंगालच्या भूमीतून आले आहे. यावर चर्चा व्हायलाच हवी. हा भारताचा वारसा आहे. एवढेच नाही तर, भारताच्या सर्वात मोठ्या लोकशाही मंदिरात वंदे मातरम् वर चर्चा होणार नाही, तर मग कुठे होणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.