बंगालमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार, भाजपा, ममतांना आव्हान देणार, २८४ जागांवर दिले उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 20:11 IST2026-03-29T20:10:38+5:302026-03-29T20:11:17+5:30
West Bengal Election 2026: काँग्रेसने बंगालमधील विधानसभेच्या २९४ पैकी २८४ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच काँग्रेस पक्ष बंगालमध्ये एकाचवेळी भाजपा आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देणार आहे.

बंगालमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार, भाजपा, ममतांना आव्हान देणार, २८४ जागांवर दिले उमेदवार
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने बंगालमधील विधानसभेच्या २९४ पैकी २८४ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच काँग्रेस पक्ष बंगालमध्ये एकाचवेळी भाजपा आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देणार आहे. आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीमधून काँग्रेसने आपल्या मुर्शिदाबाद आणि मालदा या पारंपरिक बालेकिल्ल्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांना त्यांच्या पारंपरिक बहरामपूर मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. तर हल्लीच तृणमूल काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आलेल्या मौसम नूर यांना मालतीपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने भवानीपूर विधानसभा मतदारसंघामधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात प्रदीप प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजपाने शुभेंदू अधिकारी यांना रिंगणात उतरवले आहे. त्याशिवाय काँग्रेसने हेमताबाद येथून अनामिका राय यांना, तर जंगीपूर येथून मोहम्मद इमरान अली यांना उमेदवारी दिली आहे. तर तुफानगंज येथून देबेंद्रनाथ यांना आणि दिनहाटा येथून हरिहर राय यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने पश्चिम बंगालमधील उमेदवारांची निवड करताना मालदा आणि मुर्शिदाबाद या पक्षाचा पारंपरिक प्रबाव असलेल्या भागात पक्षाची पकड भक्कम करण्याच्या रणनीतीवर भर दिला आहे.