प. बंगाल : भाजपने केली उमेदवार यादी जाहीर; शुभेंदू अधिकारी नंदीग्राम, भवानीपूरमधून मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 08:31 IST2026-03-17T08:30:27+5:302026-03-17T08:31:06+5:30
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान २३ आणि २९ एप्रिल रोजी होईल. शुभेंदू अधिकारी यांची नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी हे भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

प. बंगाल : भाजपने केली उमेदवार यादी जाहीर; शुभेंदू अधिकारी नंदीग्राम, भवानीपूरमधून मैदानात
नवी दिल्ली/कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने सोमवारी १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विरोधी नेते शुभेंदू अधिकारी नंदीग्राम आणि भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भवानीपूर हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असून, त्यांच्याविरोधात शुभेंदू निवडणूक लढविणार असल्याचे त्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान २३ आणि २९ एप्रिल रोजी होईल. शुभेंदू अधिकारी यांची नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी हे भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
नंदीग्राम येथे जमीन संपादनाविरोधात २००७ साली झालेल्या आंदोलनाचा ममता बॅनर्जी यांना त्या राज्यातील सत्ता मिळण्यासाठी मोठा फायदा झाला होता. भवानीपूर हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानण्यात येतो. २०२१च्या पोटनिवडणुकीत त्यांनी तिथे ५८,००० हून अधिक मतांनी विजय मिळवला होता.
केरळसाठी भाजपने ४७ उमेदवार केले घोषित -
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी ४७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि वी. मुरलीधरन यांचा समावेश आहे.
याशिवाय माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना कंजीरापली मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले आहे. केरळमधील विधानसभा निवडणुका ९ एप्रिल रोजी होणार असून, मतमोजणी ४ मे रोजी केली जाईल.
उर्वरित मतदारसंघांसाठी उमेदवारांची अंतिम यादी तीन ते चार दिवसांत जाहीर केली जाईल. या राज्यातील विधानसभा निवडणुका २३ व २९ एप्रिलला होणार असून, मतदानाची मोजणी ४ मे रोजी केली जाईल.
विधानसभा निवडणुका ही डाव्यांसाठी अस्तित्वाची लढाई
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुचेरीतील विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांना त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत. केरळमधील आपले एकमेव सत्ताकेंद्र टिकवून ठेवण्याबरोबरच पश्चिम बंगालमध्ये गमावलेली राजकीय जमीन पुन्हा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. डाव्या पक्षांच्या नेत्यांनी सांगितले की, ज्या प्रदेशांमध्ये प्रभाव कमी आहे, तेथे संघटनात्मक बळ पुन्हा उभारण्यासाठी, विद्यमान आधार टिकवण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.