पश्चिम बंगालमध्ये शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला. मेदिनीपूर जिल्ह्यातील बेलदा येथील राणीसराय परिसरात कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास स्कॉर्पिओ कारमध्ये बसून जगन्नाथाच्या दर्शनासाठी आसनसोलहून दिघा येथे जात होती. परंतु, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वर स्कॉर्पिओ आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, स्कॉर्पिओ कारचालकाने नियंत्रण गमावले आणि त्यांची कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरची मदत घ्यावी लागली.
या घटनेची माहिती मिळताच बेलदा पोलिस ठाणे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. सर्व मृतदेह बेलदा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सर्व मृत पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि स्थानिक लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.