वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 06:11 IST2025-07-16T06:11:13+5:302025-07-16T06:11:30+5:30
अंतराळात प्रयोग करणारे शुभांशू पहिले भारतीय अंतराळवीर, ७ दिवस राहणार वैद्यकीय निरीक्षणाखाली, ‘गगनयान’ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा

वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १८ दिवस मुक्काम केल्यानंतर शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीर ड्रॅगन ग्रेस यानाच्या सहाय्याने मंगळवारी पृथ्वीवर सुखरूप दाखल झाले. वातावरणात दाखल झाल्यानंतर हे यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे सॅन दिएगो किनाऱ्याजवळच्या समुद्रात पॅराशूटच्या साहाय्याने उतरविण्यात आले. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रयाण केलेले, तिथे शास्त्रीय प्रयोग करणारे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या अनुभवांचा मोठा फायदा भारताच्या गगनयान मोहिमेला होईल.
‘ॲक्सिओम-४’ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले शुभांशू शुक्ला, मोहिमेच्या कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस्झ उझनांस्की-व्हिस्नेव्स्की, हंगेरीचे तिबोर कापूचार हे अंतराळवीर सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४:५० वाजता ड्रॅगन ग्रेस या यानातून पृथ्वीवर येण्यास निघाले होते.
अंतराळात शुभांशू यांनी केले हे प्रयोग
शुभांशू सातही मायक्रोग्रॅव्हिटी प्रयोग व इतर नियोजित कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली. यात टार्डिग्रेड्स, मायोजेनेसिस, मेथी-मूग अंकुरण, सायनाबॅक्टेरिया, मायक्रोअल्गी, पीक बियाणे आणि ‘वॉयेजर डिस्प्ले’ प्रयोगांचा समावेश आहे.
ऑक्सिऑम-४ या मोहिमेसाठी
इस्रोने ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. २०२७मध्ये भारताच्या गगनयान मोहिमेद्वारे अंतराळयान प्रक्षेपित होणार आहे. त्याद्वारे भारतीय अंतराळवीरांना अंतरिक्षात नेण्यात येईल.
२२ तास २५ मिनिटांचा असा होता प्रवास
दिवस पहिला I १४ जुलै
दु. २.५० : कॅप्सूलचा दरवाजा बंद केला
दु. ४.3५ : कॅप्सूल आयएसएसपासून वेगळे झाले
दु. ४.3५ : पहिले वेग नियंत्रण
दु. ४.४० : दुसरे वेग नियंत्रण
सायं. ५.२८ : तिसरे वेग नियंत्रण
सायं. ६.१५ : चाैथे वेग नियंत्रण
दिवस दुसरा I १५ जुलै
दु. २.०७ : पृथ्वीच्या दिशेने परतीसाठी कक्षेबाहेर जाण्यासाठी इंजिन चालू
दु. २.२६ : कॅप्सूलचा मागचा भाग (ट्रंक) वेगळा करण्यात आला
दु. २.३० : कॅप्सूलचे पुढचे कव्हर (नोजकोन) बंद करण्यात आले
दु. २.५७ : लहान पॅराशूट्स उघडले
दु. २.५८ : मुख्य पॅराशूट्स उघडले
दु. ३.०० : ड्रॅगन स्प्लॅशडाऊन (पाण्यावर यान अलगद उतरले.)
शुभांशु १७ ऑगस्टपर्यंत भारतात येणार : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, शुभांशु शुक्ला १७ ऑगस्टपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. या मोहिमेनंतर शुभांशू काही गोष्टींमध्ये व्यग्र असणार आहेत. त्यांना सात दिवस डाॅक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत त्यांची चर्चा होणार आहे.