"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:24 IST2025-06-01T16:23:00+5:302025-06-01T16:24:00+5:30
ममता बॅनर्जी यांनी बंगालसाठी काय केले? जर बंगालमध्ये विकास करायचा असेल तर मोदी सरकार आणावे लागेल असं शाह यांनी म्हटलं.

"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
कोलकाता - २०२६ मध्ये पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी सरकार कायमचे उखडून टाकू. जेव्हाही शुभेंद्रु विधानसभेला उभे राहतात तेव्हा दीदी घाबरते. निवडणुकीत हिंसाचाराचा आधार घेतात. लोकशाहीत हिंसाचाराला जागा नाही. हिंसेविना मतदान घ्या मग तुम्हाला वास्तव काय ते कळेल अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रविवारी कोलकाताच्या नेताजी स्टेडिअममध्ये भाजपा कार्यकर्त्यांना शाह यांनी संबोधित केले.
यावेळी अमित शाह म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये केवळ निवडणूक मर्यादित नाही तर सुरक्षा हेदेखील महत्त्वाचं कारण आहे. गेली अनेक वर्ष ममता बॅनर्जी यांच्या आशीर्वादाने मोठ्या संख्येत घुसखोर बांगलादेशातून भारतात प्रवेश करतात. इथे व्होटबँकचे राजकारण केले जाते परंतु हे दीर्घकाळ चालणार नाही. २०१७ च्या निवडणुकीपासूनच आम्ही १९ व्या लोकसभेची तयारी केली होती. २०१५ च्या निवडणुकीत आम्ही ५५ जागा जिंकल्या. २४ व्या लोकसभेत भाजपा ९७ जागा पुढे होती. आम्हाला १४३ जागांवर ४० टक्क्याहून अधिक मते मिळाली. याचा अर्थ टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणखी काही मेहनत घेतली तर पुढील निवडणुकीनंतर आपले सरकार तयार होईल असं शाह यांनी आकडेवारीसह सांगितले.
तसेच मुर्शिदाबाद येथे दंगल झाली, तेव्हा आम्ही ममता बॅनर्जी यांना दंगल रोखण्यासाठी बीएसएफ पाठवण्याचा आग्रह धरला परंतु ममता यांनी त्यावर असहमती दर्शवली. हिंदूंवर अत्याचार केले. त्यानंतर बीएसएफ त्यांना वाचवण्यासाठी पोहचली. मुर्शिदाबादची दंगल राज्य पुरस्कृत होती. मोदी सरकारने वक्फ विधेयक आणून काय चुकीचे केले...वक्फ विधेयकाचा विरोध करून ममता बॅनर्जी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतेय असा सवालही अमित शाह यांनी विचारला.
पश्चिम बंगाल में भाजपा के कार्यकर्ता जनविरोधी ममता सरकार को उखाड़ फेंकने के लिए कटिबद्ध हैं। कोलकाता में विजय संकल्प कार्यकर्ता सम्मेलन से लाइव...
— Amit Shah (@AmitShah) June 1, 2025
বাংলার বিজেপি কর্মীরা মমতা সরকারকে উৎখাত করতে দৃঢ়প্রতিজ্ঞ। সরাসরি বিজয় সংকল্প কার্যকর্তা সম্মেলন থেকে... https://t.co/Zda18o2ILt
दरम्यान, संदेशखलीचा मुख्य गुन्हेगार कोण, तो कोणत्या पक्षाशी जोडलेला आहे...जर आम्ही सत्तेत आलो तर सीए कायदा लागू करू. मोदी सरकारने पश्चिम बंगालला ८,२७,००० कोटी दिले, ममता बॅनर्जी यांनी बंगालसाठी काय केले? जर बंगालमध्ये विकास करायचा असेल तर मोदी सरकार आणावे लागेल. बंगालमध्ये घुसखोरी रोखायची असेल, हिंदूंवरील अत्याचार कमी करायचे असतील तर भाजपाला संधी द्या. २०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचे उखडून फेकू असं अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.