'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:38 IST2025-11-13T19:27:42+5:302025-11-13T19:38:14+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाबाबत कडक इशारा दिला आहे. या स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना इतकी कठोर शिक्षा दिली जाईल की संपूर्ण जग त्यांना पाहेल आणि यामुळे भविष्यात कोणीही असा गुन्हा करण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त होईल, असा इशारा शाह यांनी दिला.

'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोट प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गंभीर इशारा दिला आहे. 'या स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना इतकी कठोर शिक्षा दिली जाईल की संपूर्ण जग त्यांना पाहेल', असा इशारा शाह यांनी दिला. गुजरातमधील मोतीभाई चौधरी सागर सैनिक शाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शहा यांनी हे वक्तव्य केले. अशा घटनांविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाईल यावर त्यांनी भर दिला.
सोमवारी सायंकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका हळू चालणाऱ्या i20 कारमध्ये स्फोट झाला होता. या घटनेत बारा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. स्फोट इतका तीव्र होता की जवळील अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले, यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत.
दिल्ली बॉम्बस्फोटाचा संबंध फरिदाबादमध्ये नुकत्याच उघड झालेल्या दहशतवादी नेटवर्कशी आहे. संशयित अनेक व्यक्तींना आधीच अटक करण्यात आली आहे. तपास संस्था फरार असलेल्यांचा शोध घेत आहेत. शिवाय, या घटनेनंतर फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठाची चौकशी सुरू झाली आहे.
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. फारुकने हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमडी पदवी प्राप्त केली होती. तपास यंत्रणांना संशय आहे की, या विद्यापीठातील काही इतर डॉक्टरांप्रमाणेच डॉ. फारुकचेही दहशतवादी संघटनांशी संबंध असू शकतात. हापुडमधून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी दिल्लीला नेले असून, त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.