‘आम्ही लवकरच करणार हायड्रोजन बॉम्ब धमाका’; बिहारमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:29 IST2025-09-25T08:28:28+5:302025-09-25T08:29:04+5:30
मतदारयाद्यांचे विशेष पुनरावलोकन हे मोठे कारस्थान असून तो लोकशाहीसाठी धोका आहे असा आरोप काँग्रेसने केला.

‘आम्ही लवकरच करणार हायड्रोजन बॉम्ब धमाका’; बिहारमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिला इशारा
पाटणा : इंडिया आघाडी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांत विजयी झाली, तर एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या धर्तीवर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांचे (ईबीसी) संरक्षण करणारा कायदा करण्याचे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिले. मी लवकरच एका हायड्रोजन बॉम्बचा धमाका करणार असल्याचा दावाही त्यांनी बिहारमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या आयोजिलेल्या बैठकीमध्ये केला.
आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर ‘अतिपिछडा न्याय संकल्प’ कार्यक्रमाला राहुल गांधी उपस्थित राहिले. त्यावेळी ईबीसींसाठी त्यांनी १० संकल्प जाहीर केले. यावेळी तेजस्वी यादव हेही उपस्थित होते.
भाजपने नितीशकुमार यांना मानसिकदृष्ट्या निवृत्त केले
भाजपने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना ‘मानसिकदृष्ट्या निवृत्त’ केले असून तो पक्ष आता त्यांना ओझे समजत आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. ते म्हणाले की, आगामी निवडणुका या सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या शेवटाची सुरुवात असेल.
हे मोठे कारस्थान आहे...
मतदारयाद्यांचे विशेष पुनरावलोकन हे मोठे कारस्थान असून तो लोकशाहीसाठी धोका आहे. मतदारयाद्यांमध्ये बदल घडवून भाजप सत्ता टिकविण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप काँग्रेस कार्यकारिणीने केला आहे. तसा ठरावही बैठकीत संमत करण्यात आला. गाझातील निष्पाप नागरिकांच्या सुरू असलेल्या हत्यांचा काँग्रेस कार्यकारिणीने निषेध केला.