"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:05 IST2025-09-30T11:02:25+5:302025-09-30T11:05:03+5:30
PM Modi on Trump Peace Plan Gaza: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील युद्ध संघर्ष थांबवण्यासाठी एक योजना मांडली आहे. ट्रम्प यांच्या योजनेचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.

"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
PM Modi on Gaza Peace plan: गाझातील युद्ध संघर्ष कायमस्वरूप थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा शांतता करार योजना मांडली आहे. ट्रम्प यांच्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. 'ट्रम्प यांची ही योजना संपूर्ण पश्चिम आशियात दीर्घकाळीन शांततेचा मार्ग दाखवणारी आहे', असे मोदी म्हणाले आहेत.
व्हाईट हाऊसने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझा शांतता योजना जाहीर केली. एक नकाशाही व्हाईट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. अमेरिकेने मांडलेली ही योजना चांगली असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी भाष्य केले आहे.
ट्रम्प, गाझा शांतता योजना; मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आम्ही राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील संघर्ष थांबवण्यासाठी जाहीर केलेल्या व्यापक योजनेचे स्वागत करतो."
"ही योजना पॅलेस्टाईन आणि इस्रायली लोकांबरोबरच संपूर्ण पश्चिम आशियालाही एक दीर्घकालीन स्थिर शांतता, सुरक्षा आणि विकासाचा मार्गावर नेणारी आहे", असे भाष्य मोदी यांनी केले.
"आम्ही आशा करतो की, सर्व संबंधित देशांचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या या योजनेमागे एकजुटीने उभे राहतील आणि संघर्ष थांबवण्यासाठी या प्रयत्नांना पाठिंबा देतील", असे आवाहनही मोदींनी केले आहे.
काय आहे ट्रम्प यांची गाझा शांतता योजना
व्हाईट व्हाऊसने राष्ट्रपती ट्रम्प यांच्या योजनेचा नकाशा तयार केला आहे. प्रसिद्ध केलेल्या नकाशावर तीन रेषा आहेत. निळी, पिवळी आणि लाल. त्यानंतर बफर झोन आहे.
निळ्या रेषेचा अर्थ असा की, या रेषेपर्यंतचा भाग अजून इस्रायली लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे. ही रेषा युनूस खानजवळ आहे.
त्यानंतर राफाजवळून पिवळी रेषा जाते. ही रेषा लष्कर मागे घेण्याचा पहिला टप्पा असेल. त्यालाच पहिली माघार रेषा म्हटले गेले आहे. या पिवळ्या रेषेचा अर्थ ओलिसांना सोडण्याबरोबरच इस्रायली लष्कर मागे पिवळ्या रेषेपर्यंत येईल.
त्यानंतर दुसरी माघार आहे. लाल रेषेचा अर्थ असा की, दुसऱ्यांदा माघार घेतल्यानंतर इस्रायली लष्कर इथे येऊन थांबेल. त्यानंतर बफर झोन सुरू होतो. तिसऱ्यांदा लष्करी माघार घेतल्यानंतर इस्रायली लष्कर बफर झोनच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे इस्रायलच्या हद्दीत परतेल.
बफर झोनचा अर्थ असा की, हा झोन इस्रायल आणि पॅलेस्टाईन लोकांना पार करता येणार नाही. ना इस्रायलचे सैनिक बफर झोन पार करू शकणार, ना पॅलेस्टाईनचे.