आम्ही पाकिस्तानची ६ विमाने पाडली; 'ऑपरेशन सिंदूर’ हे उच्च तांत्रिक युद्धच, हवाई दल प्रमुखांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 06:17 IST2025-08-10T06:17:24+5:302025-08-10T06:17:38+5:30
पाकचे इतके मोठे नुकसान झाले की, त्यांनी थेट चर्चेचा निरोप दिला

आम्ही पाकिस्तानची ६ विमाने पाडली; 'ऑपरेशन सिंदूर’ हे उच्च तांत्रिक युद्धच, हवाई दल प्रमुखांची माहिती
बंगळुरू : 'ऑपरेशन सिंदूर'मध्येभारतीय हवाई दलानेपाकिस्तानचे मोठे नुकसान केले व यात भारताने पाकिस्तानचे एडब्ल्यूएसीएस श्रेणीतील एक विमान आणि पाच लढाऊ विमाने पाडली, अशी माहिती हवाई दल प्रमुख ए. पी. सिंह यांनी दिली. ते बंगळुरू येथील एचएएल मॅनेजमेंट अकादमी सभागृहात एअर चीफ मार्शल एलएम कात्रे मेमोरियल लेक्चरच्या १६ व्या सत्रात बोलत होते.
सिंह म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर’दरम्यानभारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सरगोधा व जेकोबाबाद हवाई तळावरील एफ-१६ विमानांना लक्ष्य केले. भारतीय हवाई दलाकडे या एफ-१६ विमानांबाबत ठोस माहिती होती.
ऑपरेशन सिंदूर उच्च तांत्रिक कौशल्याच्या आधारे केलेले युद्ध होते, असे सांगत सिंह म्हणाले की, ८० ते ९० तासांच्या युद्धात, आम्ही पाकिस्तानचे इतके मोठे नुकसान केले की त्यानंतर त्यांनी आमच्या डीजीएमओला चर्चेसाठी संदेश पाठवला.
बहावलपूर हल्ल्यानंतरचे फोटो सर्वांसमोर
२०१९ मध्ये आम्ही बालाकोटमध्ये हवाई हल्ले केले तेव्हा आम्हाला त्याचे पुरावे गोळा करता आले नाहीत. आम्ही काय केले किंवा काय केले नाही, याबद्दल लोकांनी प्रश्न उपस्थित केले.
पण, ऑपरेशन सिंदूरवेळी बहावलपूर हल्ल्याआधीचे व नंतरचे फोटो सर्वांसमोर आहेत. दहशतवादी अड्डे पूर्ण उद्ध्वस्त झाले. तिथे काहीही शिल्लक राहिले नव्हते. हे फोटो केवळ उपग्रहावरून घेतले गेले नाहीत. तर स्थानिक माध्यमांनी उद्ध्वस्त इमारतीचे आतील फोटोदेखील दाखवले, असेही त्यांनी सांगितले.
एस-४०० प्रणाली ठरली गेम चेंजर
आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने उत्तम काम केले. पाककडे लांब पल्ल्याचे ग्लाइड बॉम्ब होते, परंतु ते वापरू शकले नाहीत. कारण ते भारताची हवाई संरक्षण यंत्रणा भेदू शकत नव्हते. यात भारताची एस-४०० प्रणाली गेम चेंजर ठरली, असे सिंह यांनी सांगितले.
आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते...
या यशाचे एक प्रमुख कारण राजकीय इच्छाशक्ती होती. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. यामुळे आम्ही योजनेची प्रभावी अंमलबजावणी करू शकलो. तिन्ही दलांमध्ये समन्वय होता, असे सिंह यांनी नमूद केले.
कसे झाले ऑपरेशन सिंदूर?
७ मे रोजी मध्यरात्री १.३० वाजता भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईत दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हवाई हल्ले करण्यात आले. यात १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले.
पाकच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाने कोटली, बहावलपूर, मुरीदके, बाग आणि मुझफ्फराबाद येथे हे हल्ले केले. यात लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय व जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा तळ उद्ध्वस्त झाला.
का थांबवले? : काँग्रेस
भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडल्याचे हवाई दल प्रमुखांनी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारवर निशाणा साधला. ऑपरेशन सिंदूर का थांबवले आणि कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला? असा सवाल त्यांनी केला.