मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर याबाबत बैठक झाली. या बैठकीत बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली. मात्र, या निर्णयाविरोधात शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला आहे. बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध असून मुंबईकरांचे रोजचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसत आहे, असे आदित्य ठाकरेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या २-३ वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करण्याची बातमी आली. सामान्य मुंबईकरांचे रोजचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसत आहे. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा अशी ओळख असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचे हे अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही.'
'बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे! बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावली आहे, महत्वाचे मार्ग बंद केले आहेत, आता जर दरवाढही केली तर बेस्टवर त्याचा विपरीत परिणाम होईल. आमची ठाम मागणी आहे, इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा, बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या आणि बेस्ट वाचवा!' असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
याआधी २०१८ मध्ये बेस्टच्या भाड्यात वाढ करण्यात आली. त्यावेळी बेस्टचे भाडे आठ रुपये होते. तर, वातानुकूलित बसचे भाडे २० रुपये होती. त्यानंतर २०१९ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टच्या भाड्यात कपात करून मुंबईकरांना दिलासा दिला. सध्या बेस्टचे किमान भाडे पाच रुपये आहे. तर, वातानुकूलित बसचे किमान भाडे सहा रुपये आहे.