"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:49 IST2025-05-08T16:42:52+5:302025-05-08T16:49:02+5:30
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची भारत दौऱ्यावर आले आहेत.

"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची भारत दौऱ्यावर आले आहेत. आपल्या समकक्षांसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "तुम्ही अशा वेळी भारतात आला आहात, जेव्हा आम्ही २२ एप्रिल रोजी भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या बर्बर हल्ल्याचे प्रत्युत्तर देत आहोत. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला ७ मे रोजी सीमेपलीकडील दहशतवादी तळांवर हल्ला करावा लागला."
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढे म्हणाले की, "आमचे हे प्रत्युत्तर विचारपूर्व देण्यात आले होते. परिस्थिती आणखी चिघळवण्याचा आमचा कोणताही हेतु नव्हता. तथापि, जर आमच्यावर लष्करी हल्ला झाला, तर त्याला खूप कडक प्रत्युत्तर दिले जाईल यात शंका नाही. शेजारी देश आणि जवळचा साथीदार म्हणून, तुम्हाला या परिस्थितीची चांगली समज असणे महत्त्वाचे आहे."
राजनैतिक संबंधांचा ७५वा वर्धापन दिन!
तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "आज भारतात तुमचे आणि तुमच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना आणि तुमच्यासोबत २० व्या भारत-इराण संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवताना मला खूप आनंद होत आहे. अलिकडच्या काळात, आपल्या सहकार्याने मोठी प्रगती झाली आहे. मात्र, अशा काही परिस्थिती आहेत, ज्या आपल्याला सोडवायच्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पेझेश्कियान यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये काझान येथे भेट घेतली आणि आपले संबंध कसे दृढ होतील, याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी २६ एप्रिल रोजी फोनवरही चर्चा केली. हा आपल्या राजनैतिक संबंधांचा ७५वा वर्धापन दिन आहे. मला खात्री आहे की, आपण हा वर्धापन दिन योग्यरित्या साजरा करू."
भारत आणि इराणमधील २०व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषविण्यासाठी अरागची भारतात आले आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर इराणी परराष्ट्रमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.