"मंदिर असल्याचे पुरावे मिळाले, आम्ही...", संभल प्रकरणावर स्वामी रामभद्राचार्य यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:38 IST2024-12-23T11:38:22+5:302024-12-23T11:38:59+5:30
संभल मुद्द्यावर चिंता व्यक्त करत स्वामी रामभद्राचार्य महाराज म्हणाले, संभलमध्ये जे काही सुरू आहे, अत्यंत वाईट आहे. मात्र, यासर्वांत एक सकारात्मक गोष्ट म्हणजे, तेथे मंदिर असल्याचे मिळालेले पुरावे.

"मंदिर असल्याचे पुरावे मिळाले, आम्ही...", संभल प्रकरणावर स्वामी रामभद्राचार्य यांचे मोठे विधान
उत्तर प्रदेशातील संभल प्रकरण, बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार आणि मोहन भागवत यांचे अलिकडील विधान आदी विषयांवर जगत गुरु स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी नुकचे भाष्य केले आहे. संभल प्रकरणासंदर्भात बोलताना, मंदिरासंदर्भातील आपला संघर्ष सुरूच राहणार, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संभल मुद्द्यावर चिंता व्यक्त करत स्वामी रामभद्राचार्य महाराज म्हणाले, संभलमध्ये जे काही सुरू आहे, अत्यंत वाईट आहे. मात्र, यासर्वांत एक सकारात्मक गोष्ट म्हणजे, तेथे मंदिर असल्याचे मिळालेले पुरावे. ते पुढे म्हणाले, आम्ही हे घेऊनच राहणार. मग ते मतांच्या माध्यमाने असो, न्यायालयाच्या माध्यमाने असो अथवा जनतेच्या सहकार्याने असो. मंदिराच्या मुद्यावर आपला संघर्ष सुरूच राहणार आणि यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न करणार.
'वाट बघा, सर्वांचा सर्वनाश होईल' -
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात विचारले असता रामभद्राचार्य म्हणाले, "बांगलादेशचे अंतरिम सरकार हिंदूंवर अत्याचार करत आहे. बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान 'दुष्ट' आहेत. प्रतीक्षा करा, सर्वांचा नाश होईल. काळजी करू नका. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायानेही गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे. आम्ही सरकारला बरेच काही सांगितले आहे, परंतु ही समस्या केवळ भारत सरकारसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी हा चिंतेचा विषय आहे.
'मोहन भागवत के बयान से सहमत नहीं'
स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाशी आपण असहमत असल्याचे म्हटले आहे. मोहन भागवत म्हणाले होते की, "राम मंदिर उभे राहिल्यानंतर, आपणही नव्या ठिकानांवर अशाच पद्दतीने मुद्दे उपस्थित करून हिंदूंचे नेते बनू शकतो, असे काहींना वाटते आहे. मात्र, हे स्वीकारार्ह नाही." यावर स्वामी रामभद्राचार्य म्हणाले की, "मोहन भागवत यांच्या विधानाशी मी अजिबात सहमत नाही. मोहन भागवत अनुशासक राहिले आहेत. मात्र, त्यांचा विचार यावेळी त्यांच्याशी जुळत नाही."