we diluted article 370 in jammu kashmir twelve times without any controversy claims congress | 'आम्ही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली'
'आम्ही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली'

देहरादून: कलम 370 बद्दल भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान देणाऱ्या भाजपालाकाँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही कलम 370 मधील तरतुदींची तीव्रता 12 वेळा कमी केली. मात्र यामुळे एकदाही वाद निर्माण झाला नाही, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी केला. आम्ही एक-दोनदा नव्हे, तर 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली. त्यातल्या तरतुदी सौम्य केल्या. मात्र यामुळे एकदाही वादंग निर्माण झाला नाही, असं खेडा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

देश वादातून नव्हे, तर संवादातून चालतो. काँग्रेसला या गोष्टीची कल्पना आहे. मात्र भाजपाला ही बाब समजत नाही. कारण त्यांचं संपूर्ण राजकारणच वादावर चालतं, अशी टीका खेडा यांनी केली. काँग्रेस पक्षाची कलम 370बद्दलची भूमिका जराही बदललेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपा सरकारनं ज्याप्रकारे कलम 370 हटवलं, त्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. कारण कलम 370 काढून काढण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब करण्यात आला, त्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे, असं खेडांनी म्हटलं. 

कलम 370 सोबतच वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीवरुनही खेडांनी भाजपाला लक्ष्य केलं. जीएसटी लागू करताना भाजपा सरकारनं घिसडघाई केली. त्यामुळे छोटे व्यापारी, उत्पादक आणि शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, असं खेडा म्हणाले. नोटबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था ढासळली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनीदेखील नोटबंदी केली होती. मात्र त्यामुळे कोणताही वाद निर्माण झाला नव्हता. त्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेला फटका बसला नव्हता. मात्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानं अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला, अशी टीका खेडा यांनी केली. 
 

Web Title: we diluted article 370 in jammu kashmir twelve times without any controversy claims congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.