'ते प्राचीन मंदिर रातोरात बांधलं का?', संभलमध्ये सापडलेल्या मंदिरावर सीएम योगींची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:33 IST2024-12-15T15:32:47+5:302024-12-15T15:33:47+5:30
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मुस्लिमबहुल भागात प्राचीन मंदिर सापडले आहे.

'ते प्राचीन मंदिर रातोरात बांधलं का?', संभलमध्ये सापडलेल्या मंदिरावर सीएम योगींची प्रतिक्रिया
Sambhal Temple News : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मुस्लिमबहुल भागात 46 वर्षे जुने मंदिर सापडले आहे. सध्या या विषयाची देशभरात चर्चा सुरू आहे. यावरच आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'प्रशासनाने रातोरात संभलमध्ये एवढे प्राचीन मंदिर बांधले का? बजरंगबलीची एवढी प्राचीन मूर्ती रातोरात तिथे ठेवली का? संभलमध्ये 46 वर्षांपूर्वी नरसंहार करणाऱ्या गुन्हेगारांना आजपर्यंत शिक्षा का झाली नाही? यावर चर्चा का होत नाही?' असे प्रश्न योगी आदित्यनात यांनी विचारले.
एका कार्यक्रमात अयोध्या आणि संभलचा संदर्भ देत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बांधल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले गेले, शहरातील रस्ते चौपदरी करण्यात आले. मंदिर बांधले नसते, तर अयोध्येचा एवढा विकास झाला असता का? येथे येणारा प्रत्येक भाविक कृतज्ञता व्यक्त करतो. मंदिरामुळे राज्यघटनेचा गळा घोटणाऱ्यांच्या घरी शोककळा पसरली आहे. अयोध्येच्या विकासामुळे त्यांना त्रास होतो, अशी टीका योगींनी यावेळी केली.
संभल में इतना प्राचीन मंदिर क्या रातों-रात प्रशासन ने बना दिया?
— Yogi Adityanath (@myogiadityanath) December 15, 2024
क्या वहां बजरंगबली की इतनी प्राचीन मूर्ति रातों-रात आ गई?
उन दरिंदों को आज तक सजा क्यों नहीं मिली, जिन्होंने 46 वर्ष पहले संभल में नरसंहार किया था? इस पर चर्चा क्यों नहीं होती है? pic.twitter.com/SKA0LFZdAX
मंदिर कसे सापडले?
संभलमधील हिंसाचारानंतर प्रशासनाने शहरभरात अतिक्रमनविरोधी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान, शनिवारी मुस्लिमबहुल भागात एक प्राचीन मंदिर सापडले. मंदिराच्या चहुबाजूने अतिक्रमण करुन मंदिर पूर्णपणे झाकण्यात आले होते. या मंदिरात हनुमानाची मूर्ती आणि महादेवाची पिंड आढळली आहे. मंदिराचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मंदिराची सफाई केली आणि मंदिर सर्वांसाठी खुले केले. यानंतर हिंदू समाजाने रविवारी मंदिरात विधी आणि मंत्रोच्चाराने पूजा आणि आरती केली.
मंदिरात हनुमान, गणपती, शिवलिंग आणि नंदी
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्राचीन मंदिर शेकडो वर्षे जुने असून, 1978 मध्ये झालेल्या दंगलीनंतर बंद करण्यात आले होते. दंगलीमुळे या भागातील सर्व हिंदू लोक निघून गेले, त्यामुळे या भागातील लोकांनी यावर अतिक्रमण केले. मात्र आता 46 वर्षांनंतर मंदिर पुन्हा उघडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खोदकामादरम्यान मंदिरासमोर एक विहीरही आढळून आली आहे. हे मंदिर सपा खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर आहे. सध्या डीएम आणि एसपींनी येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे.
घर बांधून मंदिरावर कब्जा केला
अतिरिक्त एसपी श्रीश चंद्र म्हणाले, मंदिराच्या आजुबाजूला घरे बांधून मंदिराचा ताबा मिळवला होता. पण, आता मंदिर उघडण्यात आले असून, मंदिरावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.