'मोदींचा आंदोलनजीवी शब्द अण्णा, बाबा रामदेव अन् किरण बेदींसाठी निर्दयी नव्हता का?'

By महेश गलांडे | Published: February 9, 2021 02:48 PM2021-02-09T14:48:15+5:302021-02-09T14:49:40+5:30

संसद सभागृहात शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलत असताना मोदींनी आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला. त्यावरुन सध्या देशभरात राजकारण तापलं आहे.

"Was Modi's agitating comment ruthless for Anna Hazare, Baba Ramdev and Kiran Bedi?" | 'मोदींचा आंदोलनजीवी शब्द अण्णा, बाबा रामदेव अन् किरण बेदींसाठी निर्दयी नव्हता का?'

'मोदींचा आंदोलनजीवी शब्द अण्णा, बाबा रामदेव अन् किरण बेदींसाठी निर्दयी नव्हता का?'

googlenewsNext
ठळक मुद्देबाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? असा खोचक प्रश्न शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावपर आभार प्रदर्शनाचे भाषण करताना विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही मोदींनी आपलं मत मांडलं. शेतकरी आंदोलनामध्ये काही आंदोलनजीवी लोक घुसले आहेत, आंदोलनजीवी नावाची नवीन जमातच अस्तित्वात आल्याचं मोदींनी म्हटलं. त्यावरुन, मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलंय. आता, माजी केद्रीयमंत्री शशी थरुर यांनीही ट्विट करुन आंदोलनजीवी या शब्दावरुन भाजपाला खोचक टोला लगावला आहे. 

संसद सभागृहात शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलत असताना मोदींनी आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला. त्यावरुन सध्या देशभरात राजकारण तापलं आहे. राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनातील नेते योगेंद्र यादव यांनी आंदोलनजीवी शब्दावरुन मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टीकैत यांनीही मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करुन आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला गर्व असल्याचं लिहलंय. त्यानंतर, आता शशी थरुर यांनीही या शब्दाचा समाचार घेताना, अण्णा आंदोलनाची आठवण करुन दिली.   

बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? असा खोचक प्रश्न शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे. मोदींनी संसदेत आंदोलनजीवी या शब्दाचा उत्सुकतेनं उल्लेख केला. पण, या आंदोलकांसाठी हा शब्द निष्ठूर नाही का? असे ट्विट थरुर यांनी केली आहे. दिल्लीतील जनलोकपाल आंदोलनाचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे. त्यामुळे, या आंदोलनातील प्रमुख अण्णा हजारे, किरण बेदी आणि बाबा रामदेव यांच्या सहभागावरुन थरुर यांनी हा टोमणा मारणारे ट्विट केलंय.

काय म्हणाले होते पंतप्रधान

आम्ही 'बुद्धीजीवी' हा शब्द ऐकला होता. परंतु आता काही लोकं 'आंदोलनजीवी' झाले आहेत. देशात काहीही झालं की ते त्या ठिकाणी पोहोचतात. कधी ते पडद्याच्या मागे असतात तर कधी पुढे. अशा लोकांना ओळखून आपल्यालाला त्यांच्यापासून वाचायला हवं, असं म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी निशाणा शाधला. "जे आंदोलनजीवी लोकं आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. परंतु कोणाचं आंदोलन सुरू असेल तर ते त्या ठिकाणी पोहोचतात. ही लोकं कोणत्याही ठिकाणी सापडतात. वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही," असंही मोदी म्हणाले. सध्या नवा FDI आला आहे. त्या 'फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी'पासून आपल्याला वाचलं पाहिजे, असंही आंतरराष्ट्रीय कटाबद्दल बोलताना मोदींनी नमूद केलं. 

संजय राऊत यांचा निशाणा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युतर दिलंय. विशेष म्हणजे गर्व से कहो हम हिंद है... या घोषवाक्याचं रुपांतरच त्यांनी आंदोलनजीवी या शब्दाशी जोडून केलंय. त्यामुळे, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न राऊत यांनी केलाय. राऊत यांनी ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टीकैत यांच्या समवेतचा फोटो शेअर केला आहे. तसेच, गर्व से कहो हम आंदोलनजीवी है... जय जवान- जय किसान असेही राऊत यांनी म्हटलंय. तसेच, मराठीतही याच आशयाचे ट्विट राऊत यांनी केलंय.

आंदोलनजीवीवरुन अमोल कोल्हेंचा भाजपाला चिमटा

देशाला आजतर दोन नवे शब्द मिळाले आहेत, त्यातला एक आहे आंदोलनजीवी. मी या शब्दाबद्दल अतिशय आभारी आहे.कारण महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते,त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं. पण, ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात, ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे, त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो. 

Web Title: "Was Modi's agitating comment ruthless for Anna Hazare, Baba Ramdev and Kiran Bedi?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.