नवी दिल्ली - दहशतवादाविरोधात भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला दिलेल्या माहितीवरून वाद वाढला आहे. ऑपरेशनच्या सुरुवातीला पाकिस्तानला संदेश पाठवला होता असं विधान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं होते. त्यांच्या या विधानावरून लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. ही चूक नसून गुन्हा आहे असं राहुल गांधींनी म्हटलं. आता संसदीय समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली.
सूत्रांनुसार, संसदेच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित समितीत चर्चेवेळी एस जयशंकर यांच्या विधानावर चर्चा झाली. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स पोस्टवर विचारलेल्या प्रश्नावर चर्चा झाली. यात परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानाची मोडतोड करून दाखवण्यात आले असं सांगितले गेले. भारताने अचूक हल्ल्याच्या सुरुवातीच्या टप्प्यानंतर पाकिस्तानला याबाबत सूचित केले होते असं परराष्ट्र सचिवांनी खुलासा केला त्याशिवाय सीजफायरमध्ये अमेरिकेची काही भूमिका नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर काय म्हणाले होते?
परराष्ट्र मंत्री जयशंकर एका व्हिडिओ क्लीपमध्ये बोलताना दिसत होते, त्यात ते म्हणाले की, ऑपरेशनच्या सुरुवातीला आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवला होता. दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर स्ट्राईक करतोय हे सांगितले. सैन्य तळांना टार्गेट करणार नाही परंतु त्यांनी चांगला सल्ला न स्वीकारण्याचे निवडले असं ते म्हणतात. खासदार राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत २ प्रश्न उपस्थित केले आणि हा गुन्हा असल्याचा आरोप केला.
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा
या व्हिडिओवरुन राहुल गांधी म्हणाले की, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मौन निषेधार्ह आहे. मी पुन्हा विचारेन की, पाकिस्तानला हल्ल्याची माहित असल्याने आपण किती भारतीय विमाने गमावली? ही चूक नव्हती, हा गुन्हा होता. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या हे मान्य केले आहे. हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे गुन्हा आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.