मुस्लिम समाजाच्या जमिनीवर सरकारचा डोळा; वक्फ विधेयकाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:37 IST2025-04-02T18:37:11+5:302025-04-02T18:37:44+5:30
Waqf Amedment Bill 2025 : काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला आणि हे विधेयक घटनाविरोधी असून धार्मिक सलोख्याला हानी पोहोचवणार असल्याचे म्हटले.

मुस्लिम समाजाच्या जमिनीवर सरकारचा डोळा; वक्फ विधेयकाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध
Waqf Amedment Bill 2025 : केंद्र सरकारने बुधवारी(2 एप्रिल 2025) वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 लोकसभेत मांडले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी हे विधेयक सभागृहात चर्चेसाठी मांडले. या विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, या विधेयकावर चर्चा सुरू असताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.
जमिनींवर सरकारचा डोळा
लोकसभेत बोलताना गोगोई म्हणाले की, या विधेयकातून एका विशेष समुदायाच्या जमिनीवर सरकारचा डोळा असल्याचे स्पष्ट होते. वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची गरज नाही असे आम्ही म्हणत नाही, पण या विधेयकामुळे अडचणी वाढतील आणि खटलेही वाढतील. या विधेयकाचा उद्देश केवळ समस्या वाढवणे हा आहे, समस्या सोडवणे नाही. सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोगोई यांनी दावा केला की, या विधेयकामुळे समाजात वाद आणि फूट पडेल.
#WATCH | Deputy Leader of Congress in Lok Sabha, Gaurav Gogoi, speaks on the Waqf Amendment Bill
— ANI (@ANI) April 2, 2025
He says, "Did the Minority Affairs Ministry make this bill, or did some other department make it? Where did this Bill come from?... Today, the condition of minorities in the country… pic.twitter.com/QJPNnwcpyI
समाजात संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न...
गोगोई पुढे म्हणतात, वक्फ विधेयकाच्या माध्यमातून सरकारला देशातील बंधुभावाचे वातावरण बिघडवायचे असून हे विधेयक आणण्यामागे त्यांचा राजकीय हेतू आहे. या विधेयकाद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत रचनेवर हल्ला करण्याचा सरकारचा हेतू आहे. सरकार संविधान कमकुवत करण्याचा, अल्पसंख्याक समुदायांचा अपमान करण्याचा आणि समाजात संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. हे विधेयक केवळ एका समाजाच्या जमिनीवर लक्ष ठेवण्यासाठी आणले असून भविष्यात इतर समाजाच्या जमिनीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला.
सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह
सरकारचे खरे उद्दिष्ट भाऊबंदकी तोडणे आणि राजकीय फायदा मिळवणे आहे. या विधेयकामागे धार्मिक विभाजनाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी गोगोई यांनी 1857 च्या बंड आणि भारत छोडो आंदोलनातील मुस्लिम समाजाच्या भूमिकेचा उल्लेख केला. भारत छोडो आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या, दांडी मार्च आणि फाळणीला विरोध करणाऱ्या समाजाला आज लक्ष्य केले जात असल्याची टीका त्यांनी केली.