इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:12 IST2025-11-26T12:10:17+5:302025-11-26T12:12:59+5:30
हेली गुब्बी ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख व सल्फर डायऑक्साइडने जवळपास १५ किमी उंच आकाशात झेप घेतली होती.

इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक
नवी दिल्ली - इथिओपियात तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्याचा स्फोट एवढा शक्तिशाली होता की आकाशात १५ किमी उंचीपर्यंत राख उडाली होती. ही राख केवळ लाल सागर पार करून येमेन व ओमानपर्यंत पसरली नाही तर इथिओपियापासून तब्बल ४,३०० किमी अंतरावरील राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. या ज्वालामुखीमुळे दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून १३ उड्डाणे रद्द करावी लागली.
हेली गुब्बी ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख व सल्फर डायऑक्साइडने जवळपास १५ किमी उंच आकाशात झेप घेतली होती. त्यामुळे सोमवारी रात्री अकरा वाजपेर्यंत राख इथोओपियापासून ४,३०० किमी दूर दिल्ली शहर तसेच राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व पंजाबपर्यंत पसरली होती. मंगळवारी सायंकाळी साडेसातपर्यंत राखेचे ढग भारतावर घोंघावतील व त्यानंतर चीनकडे सरकतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दिल्ली विमानतळावरील १३ उड्डाणे रद्द
ज्वालामुखीच्या स्फोटानंतर बाहेर पडलेल्या राखेमुळे मंगळवारी किमान ७ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली. या नैसर्गिक आपत्तीमुळे बहुतांश आंतरराष्ट्रीय विमानांना उशीर झाला आहे. एअर इंडियाची सोमवार व मंगळवारी एकूण १२ उड्डाणे रद्द करावी लागली. दिल्लीची हवा आधीच अति खराब श्रेतीत आहे. त्यात या राखेमुळे ती अधिकच खराब झाली आहे.
जीवितहानी नाही
हेली गुब्बी अत्यंत जुना व शांत ज्वालामुखी असल्याने त्याची आतापर्यंत कोणतीही नोंद झालेली नव्हती. या ज्वालामुखीचा स्फोट शक्तिशाली असला तरी जीवितहानी झालेली नाही. मात्र, येमेन व ओमान सरकारने खबरदारी म्हणून आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उत्तर भारताला फटका
इथिओपियाच्या ज्वालामुखीची राख केवळ दिल्लीतच नाही तर राजस्थान, हरियाणा, पंजाब येथेही पोहोचली आहे. तसेच ती आता हिमाचल पर्वतांच्या दिशेने पसरत आहे. त्यापूर्वी ती ओमानवरून अरबी समुद्रावरून गुजरातमध्ये पसरली होती.