Video : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला; कारच्या फोडल्या काचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:56 PM2021-05-06T16:56:42+5:302021-05-06T17:12:51+5:30

West Bengal And V Muraleedharan : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून कारची तोडफोड करण्यात आली आहे.

vmuraleedharan convoy in west bengal midnapore attacked allegation on TMC | Video : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला; कारच्या फोडल्या काचा

Video : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला; कारच्या फोडल्या काचा

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर सलग तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विराजमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्यावरुन भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून कारची तोडफोड करण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन (V Muraleedharan) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही लोकं त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आपल्याला दौरा मध्येच सोडून परतावं लागल्याचं देखील व्ही. मुरलीधरन यांनी  म्हटलं आहे.

मुरलीधर यांनी "पश्चिम मिदनापूरमध्ये तृणमूलच्या गुंडांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. गाडीच्या काचा फुटल्या. माझ्यासोबतच्या कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला झाला. त्यामुळे दौरा आटोपता घेण्यात आला" असं म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये काही जण मुरलीधरन यांच्या गाडीवर आणि त्यांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला करत असल्याचं दिसून येत आहे. गाडीच्या काचा फुटल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. तसेच या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. एका हिंदा वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"जर एखाद्या मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला होत असेल, तर बंगालमध्ये कोण सुरक्षित आहे? हा राज्य-पुरस्कृत हिंसाचार आहे. बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. या घटनेमधील दोषींवर कारवाई करण्यासाठी विशेष पावलं उचलण्याची गरज आहे" असं जावडेकरांनी म्हटलं आहे.  भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP JP Nadda) यांनी ममता बॅनर्जींवर घणाघाती आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हिंसाचार उफाळून आला आहे. यावरून नड्डा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"रक्ताने माखलेल्या हातांनी ममतांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली"; भाजपाचा हल्लाबोल

जे. पी. नड्डा यांनी "पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर ज्या प्रकारे नरसंहार सुरू आहे आणि निर्घृण हत्या होत आहेत, यावरून 36 तास मौन बाळगून या रक्तपातात आपणही सामील असल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दाखवून दिलं आहे. ममतांचं मौन हे सर्व काही बोलत आहे आणि याच रक्ताने माखलेल्या हातांनी ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत" असं म्हटलं आहे. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार आणि हत्यांचा तीव्र निषेध आहे. आम्ही बंगालच्या जनतेच्या पाठिशी उभे आहोत. ज्या ठिकाणी या हिंसक घटना आणि हत्या घडल्या आहेत तेथील नागरिकांसोबत आहोत असं देखील म्हटलं आहे. 

"जुने व्हिडीओ दाखवून भाजपा हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करतेय", ममता बॅनर्जी कडाडल्या

बंगाल ही एकता असलेली भूमी आहे असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. "अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. जिथे भाजपा जिंकलं आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ माजलेला आहे. भाजपा आता जुने व्हिडीओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यांनी असे प्रकार थांबवावेत. तुम्ही सर्वांनी निवडणुकीच्या दरम्यान बरंच काही केलं आहे. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या असून, यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: vmuraleedharan convoy in west bengal midnapore attacked allegation on TMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.