व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 05:45 IST2025-12-05T05:39:21+5:302025-12-05T05:45:43+5:30
Vladimir Putin India Visit:अमेरिकी निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर दोन महासत्तांची भेट; संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार यावर होणार महत्त्वाचे करार; तेलनिर्बंध असूनही रशिया कमी किमतीत तेल खरेदीचा देणार भारताला नवा प्रस्ताव

व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
नवी दिल्ली : दोन दिवसांच्या भारतभेटीसाठी गुरुवारी संध्याकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय शिष्टाचार मोडत पुतिन यांचे मिठी मारून स्वागत केले. त्यानंतर मोदींनी पुतिन यांना आपल्या कारमध्ये बसवले आणि कार मोदींच्या निवासस्थानाकडे रवाना झाली. तेथे रात्री पुतिन यांच्यासाठी खास भोजन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका संबंधात आलेला तणाव आणि अमेरिकेने रशियाच्या तेलआयातीवर निर्बंध घालून भारताची केलेली कोंडी या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा २७ तासांचा दौरा आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आहे. पुतिन यांची भेट २३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेचाही एक भाग आहे. पुतिन यांच्या दौऱ्यात व्यापार, संरक्षण, उर्जा आदी विषयांवर महत्त्वाचे करार होत आहेत.
पुतिन यांच्यासोबत व्यापारी शिष्टमंडळही आले आहे. जगभरात महत्त्वाचे भौगोलिक-राजकीय बदल झाले असले तरी भारत-रशियातील आठ दशकांची मैत्री टिकून आहे. ते संबंध अधिक दृढ करणे हाही या भेटीचा प्रमुख उद्देश आहे.
अधिक स्वस्त तेल विक्रीचा प्रस्ताव टॅरिफमुळे संकटात सापडलेल्या भारताला रशिया अधिक स्वस्त दरात तेल विकण्यास तयार आहे. हा मुद्दाही प्रामुख्याने चर्चेत असेल.
पुतिन यांचे आजचे कार्यक्रम
पुतिन शुक्रवारी सकाळी राजघाट येथे भेट देणार असून त्यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर हैदराबाद हाउस येथे बैठक होणार असून, मोदी-पुतिन व प्रतिनिधीमंडळामध्ये विविध विषयांवर चर्चा होईल. येथे स्नेहभोजनही होणार आहे.
ही बैठक संपल्यानंतर पुतिन रशियाच्या प्रसारण खात्याचे नवे 'इंडिया चॅनेल' सुरू करतील. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या सन्मानार्थ राजभोजनास ते उपस्थित राहतील. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ते भारतातून रशियाकडे प्रयाण करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आजच्या शिखर परिषदेतील चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे
संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे.
भारत–रशिया व्यापाराला बाह्य दबावापासून सुरक्षित ठेवणे.
लघु मॉड्युलर रिॲक्टर क्षेत्रात सहकार्याच्या नवीन शक्यता तपासणे.
कोणकोणते महत्त्वाचे करार होणार?
रशियात संचार करण्यासाठी भारतीयांना सवलती देणे.
औषध, कृषी, अन्नपदार्थ व ग्राहकोपयोगी वस्तू, खते यांचा व्यापार.
युरेशियन इकॉनॉमिक युनियन फ्री ट्रेड करार.
रशियन एस-४०० क्षेपणास्त्र, लष्करी हार्डवेअर खरेदी.
एसयू-५७ लढाऊ जेट खरेदी.
'फ्लाइंग न्यूटन'द्वारे आगमन
पुतिन ज्या विमानातून आले त्याचे नाव 'फ्लाइंग न्यूटन' असे असून त्यात अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा, क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा, बैठक कक्ष, व्यायामशाळा व वैद्यकीय कक्ष आहे. या विमानात एक न्यूक्लियर कमांड बटन असून त्याद्वारे ते हल्ल्याचा आदेश देऊ शकतात. या विमानात २६२ प्रवासी बसू शकतात व ते सलग ११ हजार किमी अंतर उड्डाण करू शकते. हे विमान हवेत असताना त्याला २ जेट विमानांचे संरक्षण दिले जाते.