Video: आता हद्दच झाली; ट्राफिक पोलिसांनी चक्क सायकलच अडवली अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 17:45 IST2019-09-20T17:29:10+5:302019-09-20T17:45:15+5:30
आता सायकल चालवणाऱ्या एक व्यक्तीला देखील ट्राफिक पोलिसांनी अडविल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: आता हद्दच झाली; ट्राफिक पोलिसांनी चक्क सायकलच अडवली अन् मग...
नवी दिल्ली: देशात नवीन मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नवीन मोटार वाहन कायद्यात दंडाची रक्कम दहापटीने वाढविण्यात आली आहे. तसेच नवे वाहतुकीचे नियम लागू झाल्यानंतर नवनवीन किस्से समोर येत आहेत. त्यातच आता सायकल चालवणाऱ्या एक व्यक्तीला ट्राफिक पोलिसांनी अडविल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ तामिळनाडूतील असून या व्हिडिओमध्ये पोलिस एका सायकल चालविणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याची विचारपूस करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या व्हिडिओसोबत पोलिसांनी सायकल चालकाला देखील हेल्मेट न घातल्यामुळे दंड केला असल्याचा मेसेज लिहिण्यात आला आहे. मात्र या सायकल चालकाला कोणत्या कारणासाठी अडविण्यात आले होते, त्याचं खरं कारण पोलिस उपनिरिक्षकांनी सांगितल आहे.
पोलिस उपनिरिक्षकांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चूकीचा संदेश लिहून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. सायकल चालक दोन्ही हात सोडून स्टंट करत सायकल चालवत होता. यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे त्या सायकल चालकाला समज देण्यासाठी थांबविण्यात आले होते. तसेच सायकल चालकावर कोणत्याच प्रकारची कारवाई केली नसल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे.