लग्नासाठीचे दागिने चोरीला गेले, पोलीस सहकार्य करेना; जम्मूमध्ये तैनात असलेल्या CRPF अधिकाऱ्याला कॅमेरासमोर रडू कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:05 IST2025-08-05T17:01:55+5:302025-08-05T17:05:29+5:30
जम्मू काश्मीरमधील एका महिला सीआरपीएफ अधिकाऱ्याचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

लग्नासाठीचे दागिने चोरीला गेले, पोलीस सहकार्य करेना; जम्मूमध्ये तैनात असलेल्या CRPF अधिकाऱ्याला कॅमेरासमोर रडू कोसळलं
Tamil Nadu CRPF:तामिळनाडूतल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका महिला अधिकाऱ्याचा रडतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेल्या या सीआरपीएफच्या महिला अधिकाऱ्याने तामिळनाडूमध्ये तिच्या कुटुंबाने दाखल केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप केला. पोलिसांच्या भूमिकेमुळे सीआरपीएफची महिला अधिकारी कॅमेऱ्यासमोर तुटून पडली आणि रडू लागली.
३२ वर्षीय महिला सीआरपीएफ अधिकाऱ्याचे नाव कलावती आहे. ती मूळची तामिळनाडूतील नारायणपुरम गावची आहे. सध्या ती जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात आहे. २४ जून रोजी तिच्या घरी चोरी झाली होती. चोरीच्या वेळी घरी कोणीही नव्हते. वडील आणि भाऊ शेतात गेले होते तर आई गुरे चरायला गेली होती. कलावती यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तिची आई घरी परतली तेव्हा तिला कुलूप तुटलेले दिसले. घरात ठेवलेले दागिने गायब होते. जराही उशीर न करता तिच्या भावाने त्याच दिवशी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून कोणीही चौकशीसाठी आले नाही. पोलिसांनी चार दिवसांनी २८ जून रोजी एफआयआर देखील नोंदवला. एवढे दिवस तक्रार का घेतली नाही असं विचारलं तेव्हा पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचे कारण दिलं, असं कलावतीने सांगितले.
कलावतीने सांगितले की लग्नासाठी साठवलेले सर्व काही चोरीला गेल्याने तिचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्यांनी वारंवार पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असंही कलावतीने सांगितले.
दुसरीकडे, कलावतीच्या आरोपांवर पोलिसांची भूमिकाही समोर आले. महिला अधिकाऱ्याचे वडील कुमारस्वामी यांनी २४ जून रोजी त्यांच्या घरात चोरीची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, कलावतीच्या लग्नासाठी ठेवलेले १५ सोन्याचे दागिने, ५०,००० रुपये रोख आणि एक रेशमी साडी चोरीला गेली. याप्रकरणी २५ जून रोजीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोटांचे ठसे आणि सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आले आहेत, असं पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास वेळ लावल्याचा दावा फेटाळून लावला. पोलिसांनी सांगितले की, 'महिला अधिकाऱ्याच्या वडिलांनी तिच्या आधीच्या पतीवर संशय व्यक्त केला होता. तपासादरम्यान, संशयितांचे मोबाइल कॉल डेटा रेकॉर्ड मिळविण्यासाठी टॉवर डंप तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात आला. या प्रकरणाचा तपास कोणताही उशीर न करता सुरू आहे.'