Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:41 IST2025-07-15T11:37:56+5:302025-07-15T11:41:01+5:30
Dharamshala Paragliding Accident Video: पॅराग्लायडर कोसळल्याने गुजरातच्या अहमदाबाद येथून आलेले २५ वर्षीय पर्यटक सतीश राजेशभाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
हिमाचल प्रदेशातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या धर्मशाळेत सोमवारी सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली. पॅराग्लायडर कोसळल्याने गुजरातच्या अहमदाबाद येथून आलेले २५ वर्षीय पर्यटक सतीश राजेशभाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धर्मशाळेच्या बाहेरील भागातील इंद्रुनाग येथे हा अपघात घडला. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
टेकऑफ करतानाच घडला अपघात
कांगराचे एएसपी हितेश लखनपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पॅराग्लायडरने टेकऑफ करताना झाला. ग्लायडर हवेत नीट उडू शकला नाही आणि काही अंतरावर जाऊन पर्यटक सतीश राजेशभाई यांना घेऊन जमिनीवर कोसळला. या अपघातात पर्यटक सतीश आणि पायलट सूरज दोघेही जखमी झाले.
Still don’t get how people trust adventure sports in India. Another life lost in Indrunag Dharamshala — 25 year old Satish from Gujarat. Just months ago a 19 year old girl lost her life at the same spot. The site was closed till September, but flights were still taking place. pic.twitter.com/fPv4XujHzf
— Nikhil saini (@iNikhilsaini) July 14, 2025
सतीश यांच्या डोक्याला, तोंडाला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने झोनल हॉस्पिटल धर्मशाळा येथे दाखल करण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना टांडा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, पायलट सूरज याच्यावर कांगरा येथील बालाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सतीश यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली असून, पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सहा महिन्यांत दुसरा बळी
इंद्रुनाग येथे गेल्या सहा महिन्यांतील हा दुसरा पॅराग्लायडिंग अपघात आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात याच ठिकाणी १९ वर्षीय भवसार खुशी हिचा मृत्यू झाला होता. तीदेखील गुजरातच्या अहमदाबादचीच रहिवासी होती. टेकऑफ करताना खुशीचा पॅराग्लायडर कोसळला होता. एएसपींनी सांगितले की, सुरक्षा मानकांची काही ठिकाणी उपेक्षा झाली होती का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
कांगराचे उपायुक्त हेमराज बैरवा यांनी जिल्ह्यातील सर्व पॅराग्लायडिंगवर १५ सप्टेंबरपर्यंत बंदी घातली आहे. या अपघातांमुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलणे आवश्यक होते. पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांमध्ये सुरक्षितता किती महत्त्वाची आहे, हे या घटनांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.