"बिहारमध्ये जिंकलो, आता बंगाल जिंकणार"; NDAच्या आघाडीनंतर भाजपच्या मंत्र्यांचे लक्ष आता पश्चिम बंगालवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:42 IST2025-11-14T11:27:49+5:302025-11-14T11:42:59+5:30
बिहार निवडणुकीचा निकाल स्पष्ट होत असताना भाजपच्या नेत्यांनी पुढील लक्ष पश्चिम बंगाल विधानसभा असल्याचे सांगितले आहे.

"बिहारमध्ये जिंकलो, आता बंगाल जिंकणार"; NDAच्या आघाडीनंतर भाजपच्या मंत्र्यांचे लक्ष आता पश्चिम बंगालवर
Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जोरदार आघाडी घेतली असून, ही आघाडी बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे. या कलांवरून आता भाजपच्या नेत्यांनी पुढील लक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवर केंद्रित केले आहे. बिहारमधील बेगूसरायचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी एनडीएच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत बिहारमधील जनतेने विकासाला पसंती दिल्याचे स्पष्ट केले. त्यांनी थेट पुढील पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे.
गिरिराज सिंह म्हणाले, "बिहारमधील जनतेला 'जंगलराज' काय आहे, हे चांगलेच माहीत आहे. येथील लोक आता भ्रष्ट नेतृत्वाला स्वीकारत नाहीत. मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून ठामपणे सांगतो, बिहारमधील आमचा विजय निश्चित आहे. आता बंगालची बारी आहे!."
यावेळी त्यांनी बंगालच्या सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. "आम्ही बंगालमध्येही जिंकू. तेथील सरकारमध्ये अव्यवस्था आहे आणि बाहेरील घटकांचा प्रभाव दिसतो. पण बंगालची जनता अखेरीस सत्य ओळखेल आणि योग्य पर्याय निवडेल," असे गिरिराज सिंह यांनी म्हटलं.
बिहारमधील सध्याचे निवडणुकीचे कल हे विकास, सामाजिक सलोखा आणि न्याय याच्या बाजूने असल्याचे सिंह यांनी सांगितले. "आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज उघडले जात आहेत. जुन्या आणि निकृष्ट चरवाहा विद्यालयांची जागा गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था घेत आहेत. हीच प्रगतीची निशाणी आहे. युवा पिढीने भलेही जंगलराजचा अनुभव घेतला नसेल, पण त्यांच्या वडिलांनी आणि ज्येष्ठांनी तो काळ पाहिला आहे. त्यामुळे बिहार पुन्हा भ्रष्ट नेत्यांच्या हातात जाणार नाही, असेही गिरिराज सिंह यांनी स्पष्ट केले.
VIDEO | Delhi: Reacting to early trends showing the NDA moving towards a clear victory, Union Minister Giriraj Singh says, “From day one, it was clear that Bihar would not accept a government of chaos, corruption, or loot. People chose peace, justice, and development. Even if… pic.twitter.com/7BxOv4F6FK
— Press Trust of India (@PTI_News) November 14, 2025
नितीश कुमारच नेतृत्व करणार
राज्यात मुख्यमंत्रिपद आणि नेतृत्वाच्या प्रश्नावर त्यांनी कोणतीही शंका नसल्याचे स्पष्ट केले. गिरिराज सिंह म्हणाले, "नवी सरकार स्थापन करताना कोणताही संभ्रम नाही. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल. जर आरजेडी असती, तर वेगळे प्रश्न निर्माण झाले असते. पण आता नेतृत्वाबद्दल कोणताही गोंधळ नाही."