The victim of Unnao Death has caused a wave of anger in the country. | मला मरायचं नाही, मी वाचेन ना?; उन्नावच्या पीडितेचे मृत्यूपूर्वीचे उद्गार

मला मरायचं नाही, मी वाचेन ना?; उन्नावच्या पीडितेचे मृत्यूपूर्वीचे उद्गार

नवी दिल्ली : ‘मला मरायचं नाही, मी वाचेन ना?..’ उन्नावमधील बलात्कार पीडितेचे हे मृत्यूपूर्वीचे उद्गार आहेत. बलात्काराच्या आरोपींनी पेटवून दिल्याने ९0 टक्के भाजलेल्या अवस्थेतही शुद्धीत असताना तिने आपल्या भावाशी अखेरच्या क्षणी बोलताना हे उद्गार काढले. गुन्हेगारांना सोडू नका, आरोपींना शिक्षा व्हायला हवी, असेही तिने भावाला सांगितले. शुक्रवारी रात्री ती मरण पावली. तिच्या मृत्यूमुळे देशात संतापाची लाटच उमटली आहे.

तिने ४0 तास मृत्यूशी झुंज दिली. गुरुवारी सकाळी रायबरेलीच्या न्यायालयात जात असताना तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपींनी मारहाण केली आणि नंतर पेटवून दिले. ते तिथून पळून गेल्यानंतर तिने आसपासच्या लोकांची मदत मागितली. सुमारे एक किलोमीटर अंतरावर ती त्या स्थितीत चालत गेली. तिथे एका व्यक्तीकडून मोबाइल मागितला आणि त्यावरून पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलीस तिथे आले आणि त्यांनी तिला आपल्या वाहनातून रुग्णालयात पोहोचविले. तेथून तिला लखनौच्या सरकारी रुग्णालयातआणि नंतर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. तिथेच तिचे निधन झाले.

तिच्या मृत्यूची बातमी उन्नावमधील तिच्या कुटुंबीयांना शनिवारी पहाटे पाच वाजता कळवण्यात आली. ती कळताच तिच्या नातेवाईकांनी हंबरडाच फोडला. दिल्लीत असलेल्या भावाने आता आरोपींना ताबडतोब फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तिचे वडील म्हणाले की, आम्हाला सरकारकडून पैसे वा कोणतीही मदत नको. आरोपींना फाशी द्या, एवढीच आमची मागणी आहे.

आरोपींनी अनेकदा आम्हाला धमक्या दिल्या, काही नातेवाईकांना मारहाणही केली, असे या मुलीच्या काकांनी सांगितले. तिच्या वहिनीच्या तोंडून शब्दही फुडत नव्हते. या कुटुंबाची आर्थिक स्थिती फार चांगली नाही. पण त्यांना सरकारकडून पैसा नको, तर न्याय हवा आहे.
हैदराबादमधील बलात्कार प्रकरणातील संशयीत शुक्रवारी पहाटे पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर शुक्रवारी देशात अनेकांनी आनंद व्यक्त केला होता. पण रात्री उन्नावमधील या तरुणीच्या मृत्यूचे वृत्त आले. सर्व राजकीय नेत्यांनी तिच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका केली आहे. राज्य सरकारने सर्व आरोपींना निश्चितच कडक शिक्षा होईल, असे म्हटले आहे. राज्याच्या काही मंत्री व भाजप नेत्यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधीही कुटुंबीयांना भेटायला उन्नावला गेल्या.

निर्भयाची आई झाली अस्वस्थ

या युवतीच्या मृत्यूची बातमी कळताच निर्भयाची आई खूपच अस्वस्थ झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूच आले. ती म्हणाली की, हैदराबादच्या गुन्हेगारांना शिक्षा झाली, म्हणून काम समाधान झाले होते. पण आज ही दु:खाची बातमी. काय होतंय हेच कळत नाही.

भाजप नेत्याच्या आरोपी आमदाराला शुभेच्छा

उन्नावमधील आणखी एका बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदार कुलदीप सेंगर हा आरोपी आहे. तो सध्या तिहार कारागृहात आहे. त्या प्रकरणातील पीडितेलाही असाच त्रास देण्यात आला. तिच्या वडिलांना पोलिसांनी खोट्या आरोपांखाली डांबून ठेवले. तिथेच त्यांचे निधन झाले. ती आपल्या नातेवाईक व वकिलांसह न्यायालयात जात असताना एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. त्यात तिचे दोन नातेवाईक मरण पावले. भाजपचे नेते साक्षी महाराज यांनी कुलदीप सेंगरला आज वाढविदसाच्या शुभेच्छा दिल्या. हेच साक्षी महाराज आज मरण पावलेल्या कुटुंबीयांच्या सांत्वनालाही गेले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The victim of Unnao Death has caused a wave of anger in the country.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.