वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चढणे पडले महागात, भरावा लागला मोठा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:56 IST2024-12-05T16:55:49+5:302024-12-05T16:56:21+5:30
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. असाच काहीसा प्रकार कानपूरमध्ये एका व्यक्तीसोबत घडला आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चढणे पडले महागात, भरावा लागला मोठा दंड!
Vande Bharat Express : देशातील सर्वात प्रिमियम ट्रेन म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेस. ही ट्रेन आपल्या स्पीडपासून ते टायमिंगपर्यंत आणि खास सुविधांमुळे सध्या जास्त चर्चेत आहे. परंतु या फीचर्सव्यतिरिक्त, ही वंदे भारत एक्सप्रेस विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. असाच काहीसा प्रकार कानपूरमध्ये एका व्यक्तीसोबत घडला आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवेश केल्यामुळे संबंधित व्यक्तीला 2870 रुपये दंड भरावा लागला आहे. दरम्यान, एक वडील आपल्या मुलाला वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसवण्यासाठी उत्तर प्रदेशातील कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर गेले होते. ही वंदे भारत एक्सप्रेस दिल्लीला येणार होती. ज्यावेळी कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेस आली. त्यावेळी ते आपल्या मुलाला डब्यात सीटवर बसवण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चढले आणि हीच त्यांची मोठी चूक ठरली.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आतमध्ये गेल्यानंतर ते लगेच बाहेर आले नाहीत. यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेसचे दरवाजे बंद झाले. त्यामुळे ते आतच अडकले. आपल्या मुलाला बसण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये गेलेल्या वडिलांना बाहेर पडता आले नाही. अशा परिस्थितीत ट्रेन नॉन स्टॉप असल्यामुळे पुढचे स्टेशन नवी दिल्ली होते. त्यामुळे जेव्हा नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आले, तेव्हाच त्यांना वंदे भारत एक्सप्रेसमधून उतरता आले. यावेळी कानपूर ते दिल्ली असा विनाकारण प्रवास करावा लागला आणि विना तिकीट प्रवास केल्याबद्दल रेल्वेने त्यांच्याकडून 2870 रुपये दंडही वसूल केला.