उत्तर प्रदेशात बस आणि व्हॅनची भीषण धडक, आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 22:39 IST2020-02-16T22:26:06+5:302020-02-16T22:39:49+5:30
घटनेनंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

उत्तर प्रदेशात बस आणि व्हॅनची भीषण धडक, आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू
उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि व्हॅन यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला.
ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर उन्नाव टोल प्लाझाजवळ ट्रक आणि व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेनंतर व्हॅनला आग लागली. या आगीत सात जणांचा जळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, टायर फुटल्याने मारूती व्हॅनवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ट्रकला धडक दिल्यानंतर व्हॅनला आग लागली. यात व्हॅनमध्ये प्रवास करणाऱ्या सात जणांचा जागीच जळून मृत्यू झाला. या घटनेनंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात 10 जानेवारीला उत्तर प्रदेशच्या कानौजमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर बस आणि ट्रकला आग लागली होती. या आगीत दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या होत्या. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला होता तर 21 जण गंभीर जखमी झाले होते.