राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 17:21 IST2025-04-27T17:19:59+5:302025-04-27T17:21:02+5:30
Uttar Pradesh : समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी राजपूत राजे राणा सांगा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते.

राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
Uttar Pradesh : राणा सांगा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन यांच्यावर रविवारी(27 एप्रिल) अलिगडमध्ये हल्ला झाला. ते आपल्या ताफ्यासह आग्राहून बुलंदशहरकडे जाताना गोभना टोल प्लाझाजवळ करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुमन यांच्या गाडीवर टायर फेकले, ज्यामुळे ताफ्यातील अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रामजी लाल सुमन यांचा ताफा दुपारी 2 वाजेच्या सुमारास गोभना टोल प्लाझावरुन जात असताना करणी सेनेशी संबंधित क्षत्रिय समाजाच्या तरुणांनी त्यांच्यावर टायर आणि दगडफेक केली. या हल्ल्यानंतर ताफ्यातील वेगाने येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटने सुमन किंवा इतर कुणालाही दुखापत झाली नाही. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बुलंदशहरला रवाना झाले.
रामजीलाल सुमन वादात
समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत बोलताना महान राजपूत राजे राणा सांगा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी राणा सांगा यांना गद्दार म्हणत भाजपची त्यांच्याशी तुलना केली होती. या वक्तव्यानंतर मोठा वाद उफाळून आला. राजपूत समाजासह करणी सेनेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, काही दिवसांपूर्वीच करणी सेनेने त्यांच्या राहत्या घरावरही हल्ला केला होता.
माफी मागण्याची मागणी
करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश सिंह यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जोपर्यंत रामजीलाल सुमन त्यांच्या विधानाबद्दल माफी मागत नाहीत, तोपर्यंत असे निषेध आणि हल्ले सुरूच राहतील, असा पवित्रा करणी सेनेने घेतला आहे. दरम्यान, या घटनेवर प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मात्र, हल्ल्यानंतर सपा कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांमध्ये संताप आहे.