यूपीतील गाझियाबाद जिल्ह्याचे नाव बदलणार, महापालिकेची मंजुरी; 'या' तीन नावांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 21:05 IST2024-01-09T21:04:15+5:302024-01-09T21:05:10+5:30
अलाहाबाद आणि फैजाबादनंतर आता गाझियाबादचे नाव बदलले जाणार आहे.

यूपीतील गाझियाबाद जिल्ह्याचे नाव बदलणार, महापालिकेची मंजुरी; 'या' तीन नावांची चर्चा
गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांची/शहरांची नावे बदलणे अजूनही सुरुच आहे. या यादीत आता गाझियाबाद जिल्ह्याचे नावही जोडले जाणार आहे. महापालिकेच्या बैठकीत जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्याचे नाव बदलले जाण्याची शक्यता आहे. यावेळी तीन नावांचा प्रस्ताव मांडला आहे.
या तीन नावांची चर्चा
गाझियाबाद महापालिकेच्या बैठकीत नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर होताच जय श्री राम, वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या. गाझियाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला काही नगरसेवकांनीच विरोधही केला. आता नाव बदलण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारकडे पाठवला जाणार आहे. जिल्ह्यासाठी गजनगर, हरनंदीनगर आणि दूधेश्वर नगर ही नावे पुढे आली असून, त्यापैकी एका नावावर निर्णय होणार आहे. नाव बदलण्याचा अंतिम निर्णय उत्तर प्रदेश सरकार घेईल.
पूर्वीही नावे बदलली
उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यानंतर शहरांची नावे बदलण्याचा क्रम सुूरू झाला. सुरुवातीला अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबादचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले. याशिवाय मुघलसराय रेल्वे स्थानकाचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन करण्यात आले. तसेच झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक करण्यात आले. अलीगडचे नाव हरिगड ठेवण्याचीही चर्चा सुरू आहे.