कन्हैया कुमारवर तरुणाकडून शाईफेक; काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 16:20 IST2022-02-01T16:19:36+5:302022-02-01T16:20:01+5:30
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी दाखल झालेल्या काँग्रेस नेता कन्हैया कुमारवर शाईफेक केल्याची घटना समोर आली आहे.

कन्हैया कुमारवर तरुणाकडून शाईफेक; काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी दाखल झालेल्या काँग्रेस नेता कन्हैया कुमारवर शाईफेक केल्याची घटना समोर आली आहे. लखनौच्या काँग्रेस कार्यालयात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी शाईफेक केलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे.
काँग्रेस नेता कन्हैया कुमार आज लखनौ मध्य विधानसभा मतदानर संघाचे काँग्रेसचे उमेदवार सदफ जफर यांच्या प्रचारासाठी पोहोचला होता. काँग्रेसच्या लखनौ प्रदेश कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका तरुणानं कन्हैया कुमारवर शाईफेक केली. त्यानंतर उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी तरुणाला पकडून जबर मारहाण केली आहे.
लखनौमध्ये विधानसभेच्या एकूण ९ जागा आहेत. पण सर्वाचं लक्ष लखौ मध्य विधानसभा मतदार संघाकडे लागून राहिलं आहे. कारण या मतदार संघावर नेहमीच भाजपाचं वर्चस्व राहिलं आहे आणि सलग ७ वेळा भाजपाचा उमेदवार निवडून येण्याचा विक्रम या मतदार संघाच्या नावावर आहे. २०१७ साली या मतदार संघातून योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री ब्रजेश पाठक निवडणुकीच्या रिंगणात होते. ब्रजेश पाठक यांनी सपाच्या रविदास मेहरोत्रा यांचा ५ हजाराहून अधिक मतांच्या फरकानं पराभव केला होता.