‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 10:49 IST2025-09-14T10:48:52+5:302025-09-14T10:49:29+5:30
Uttar Pradesh Crime News: सीएचं काम करणाऱ्या एका तरुणाच्या पत्नीने ११ वर्षीय मुलासह इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली आहे.

‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
''आम्ही हे जग सोडत आहोत. सॉरी... आता आम्ही तुला आणखी त्रास देऊ इच्छित नाही. आमच्यामुळे तुमचं जीवन खराब होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. आमच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही’’, अशी चिठ्ठी लिहत सीएचं काम करणाऱ्या एका तरुणाच्या पत्नीने ११ वर्षीय मुलासह इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली आहे. ग्रेटर नोएडा येथील एस सिटी सोसायटीमध्ये राहणारे सीए दर्पण चावला यांची पत्नी साक्षी चावला (३७) हिने त्यांचा ११ वर्षांचा मुलगा दक्ष याच्यासोबत १३ व्या मजल्यावरून उडी मारली.
या घटनेबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १० वाजता सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात आरडाओरडा ऐकू आला. लोक भीतीने बाल्कनी आणि खिडक्यांमधून डोकावून पाहू लागले. तेव्हा एक आई आणि मुलगा जमिनीवर पडलेले दिसून आले तसेच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला.
त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच मृत महिलेच्या घराची झडती घेतली. तेव्हा घरात एक पत्र सापडले. हे पत्र मृत साक्षी हिने पती दर्पण चावला यांना उद्देशून लिहिले होते. त्यात तिने लिहिले की, ‘’आम्ही हे जग सोडत आहोत. सॉरी... आता आम्ही तुला आणखी त्रास देऊ इच्छित नाही. आमच्यामुळे तुमचं जीवन खराब होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. आमच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही’’.
प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. तसेच मृत महिलेच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी हिचा मुलगा दक्ष हा मानसिकदृष्ट्या आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. तो शाळेत जात नव्हता. तसेच औषधोपचारांवर अवलंबून होता. त्यामुळे साक्षी ही तणावाखाली होती. दरम्यान, माझं जगणं खूप कठीण झालेलं आहे, असं ती शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगायची. अखेरीस तिने मुलासह मिळून टोकाचं पाऊल उचललं.
ही घटना घडली त्या दिवशी दर्पण चावला हे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उठले. त्यांनी पत्नी साक्षी हिला मुलाला औषध देण्यास सांगितले. त्यानंतर साक्षीने दक्षला उठवले आणि औषध दिले. त्यानंतर त्याला फिरण्यासाठी बाल्कनीमध्ये घेऊन गेली. काही वेळातच हे दोघेही खाली पडले. प्रकार एवढ्या झटपट घडला की, कुणाला काही समजले नाही.