Uttar Pradesh Assembly Election: शिवसेनेनं यूपीत पाठिंबा दिलेला उमेदवार गळ्यात चपलांचा हार घालून फिरतोय; नेमकं चाललंय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:24 IST2022-02-03T12:45:45+5:302022-02-03T16:24:31+5:30
Uttar Pradesh Assembly Election: अलिगढ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा; उमेदवाराचा प्रचार ठरतोय लक्षवेधी

Uttar Pradesh Assembly Election: शिवसेनेनं यूपीत पाठिंबा दिलेला उमेदवार गळ्यात चपलांचा हार घालून फिरतोय; नेमकं चाललंय काय?
अलिगढ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि मुख्य विरोधक असलेल्या समाजवादी पक्षात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. सत्ता राखण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली आहे. तर सत्ता बदल करण्यासाठी सपानं कंबर कसली आहे. तर अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार नशीब आजमवत आहेत. अलिगढ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पंडित केशव देव यांचा निवडणूक प्रचार लक्षवेधी ठरला आहे.
अपक्ष उमेदवार असलेल्या पंडित केशव देव यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह चप्पल आहे. त्यामुळे केशव देव गळ्यात चपलांचा हार घालून फिरत आहेत. लोकांच्या भेटीगाठी घेऊन मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. भाजप नेते धमक्या देत असल्याचा आरोप केशव देव यांनी केला.
बुधवारी केशव देव एलआययू कार्यालयात पोहोचले. आपल्या जीवाला धोका असून त्यांनी गनरची मागणी केली. प्रचार सुरू असताना भाजप नेते आपल्या सोबत काहीतरी बरं वाईट करू शकतात. जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन गनर देण्यात यावा, अशी मागणी देव यांनी केली.
भ्रष्टाचार म्हणजे वाळवी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र पुराव्यांसह भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आणूनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कारवाई करत नाहीत, असं केशव देव म्हणाले. भाजपच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी चपलांचा हार तयार आहे, असं देव यांनी सांगितलं.