तलवारी, त्रिशूळ, भाले...; युपीतील शेतकऱ्याला सापडली 4000 वर्षे जुनी तांब्याची हत्यारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 15:03 IST2022-06-24T15:02:59+5:302022-06-24T15:03:32+5:30
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याला शेतजमीन सपाट करत असताना जमिनीत ही शस्त्रे सापडली आहेत.

तलवारी, त्रिशूळ, भाले...; युपीतील शेतकऱ्याला सापडली 4000 वर्षे जुनी तांब्याची हत्यारे
मैनपुरी: उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका शेतकऱ्याला शेत जमीन सपाट करताना हजारो वर्षे जुनी शस्त्रे सापडली आहेत. तलवारी, सुरे, त्रिशूळ, भाले, अशी तांब्यापासून बनवलेली ही शस्त्रे आहेत. ही शस्त्रे सापडताच, तात्काळ ही माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. स्थानिक पोलीस आणि भारतीय पुरातत्व विभागाने हे शस्त्र सापडलेलं ठिकाण सील केलं आणि शस्त्रे ताब्यात घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मैनपुरी जिल्ह्यातील तहसली कुरवली भागातील गणेशपूर गावातील आहे. येथील शेतकरी बहादूरसिंग फौजी शेतात मातीचा ढिगारा सपाट करत होते. यादरम्यान, जमिनीतून मातीचे लेप असलेली शस्त्रे मिळू लागली. आणखी उत्खनन केले असता 39 धातूची शस्त्रे बाहेर आली. शेतकऱ्याने ही हत्यारे सोने-चांदी म्हणून आपल्या घरी नेली. मात्र शेतात शस्त्रे सापडल्याची माहिती संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर स्थानिक पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि सर्व शस्त्रे ताब्यात घेऊन ज्या ठिकाणी शस्त्र सापडले ते ठिकाण सील करण्यात आले.
4000 वर्षे जुन्ही शस्त्रे
ही शस्त्रे पाहून पुरातत्व तज्ज्ञांचीही उत्सुकता वाढली आहे. तांब्याच्या शस्त्रांच्या तपासणीनंतर आलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांमुळे पुरातत्वशास्त्रज्ञ खूपच रोमांचित आहेत. हे ज्ञात आहे की प्राचीन काळातही भारतीय सैनिकांकडे प्रगत शस्त्रे होती. द्वापर काळातील ही शस्त्रे असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. ही शस्त्रे 4000 वर्षे जुनी असल्याचे मानले जाते.