भारतासाठी अमेरिकेची ३० हजार अब्ज डॉलरची बाजारपेठ खुली; करारामुळे भारताला काय फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 06:35 IST2026-02-08T06:32:24+5:302026-02-08T06:35:33+5:30

व्यापार कराराचा अंतरिम आराखडा निश्चित; शनिवारपासूनच अंमलबजावणी सुरू, भारतावरील अतिरिक्त शुल्कही रद्द, वस्त्रोद्योगापासून औषध निर्मिती क्षेत्रांना बूस्ट

US opens $30 trillion market to India; What will be the benefits for India from the agreement? | भारतासाठी अमेरिकेची ३० हजार अब्ज डॉलरची बाजारपेठ खुली; करारामुळे भारताला काय फायदा होणार?

भारतासाठी अमेरिकेची ३० हजार अब्ज डॉलरची बाजारपेठ खुली; करारामुळे भारताला काय फायदा होणार?

दिल्ली/ नवी वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यात शनिवारी अंतरिम व्यापार करारासाठी एका आराखड्यावर सहमती झाली. या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी अनेक वस्तूंवरील आयात शुल्कात कपात केली जाणार आहे. या करारानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील सध्या लावलेले ५० टक्के शुल्क कमी करून ते १८ टक्क्यांवर आणले आहे, तर भारताने सर्व अमेरिकी औद्योगिक वस्तू आणि अन्न व कृषी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर आयात शुल्क पूर्णपणे रद्द किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात भरड धान्य, पशुखाद्यासाठी लाल ज्वारी, सुका मेवा, ताजी व प्रक्रिया केलेली फळे, सोयाबीन तेल, मद्य, स्पिरिट यांचा समावेश आहे.

दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनानुसार भारताने पुढील पाच वर्षात ५०० अब्ज डॉलर किमतीची अमेरिकी ऊर्जा उत्पादने, विमाने आणि त्यांचे सुटे भाग, मौल्यवान धातू, तंत्रज्ञान उत्पादने आणि कोकिंग कोल खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या करारामुळे भारतीय निर्यातदारांसाठी हा मोठा दिलासा असून ७ फेब्रुवारी २०२६ नंतर आता त्यांची उत्पादने अमेरिकी बाजारपेठेत २५ टक्क्यांनी स्वस्त होतील

ट्रम्प यांच्या आदेशावर स्वाक्षऱ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एका कार्यकारी आदेशाद्वारे, रशियाकडून होणाऱ्या तेलाच्या खरेदीवरून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतावर लादलेले २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क हटवले. भारताने तेल खरेदी बंद करण्याच्या दिशेने अनेक महत्त्वाची पावले उचलली असून, त्यांनी रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तेल आयात बंद करण्याची वचनबद्धता दर्शवली आहे, असे ट्रम्प म्हणाले.

भारताचा फायदा

वस्त्रोद्योग : कपडे आणि तयार कापड अमेरिकेत स्वस्त मिळतील, त्यामुळे मागणी वाढेल.
औषध निर्मिती : जेनेरिक औषधांवरील कर शून्य झाल्यामुळे भारतीय औषध कंपन्यांना मोठी बाजारपेठ मिळेल.
हस्तशिल्प : भारतीय कारागिरांनी बनवलेल्या वस्तूंना तिथे चांगली किंमत मिळेल.
रत्ने आणि दागिने : हिरे आणि दागिन्यांची निर्यात वाढेल.
चर्मोद्योग : चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे.

अमेरिकेचा फायदा

शेती आणि पशुखाद्य : अमेरिकी कापूस, बदाम, अक्रोड आणि विशेषतः पशुखाद्यासाठी लागणारी लाल ज्वारी भारतात स्वस्त येईल.
तंत्रज्ञान : अमेरिकन कंपन्यांचे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट आणि डेटा सेंटरसाठी लागणारी उपकरणे भारतात अधिक प्रमाणात विकली जातील.
ऊर्जा क्षेत्र : भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल व कोळसा खरेदी करील.
फायदा होणारी प्रमुख क्षेत्रे : वस्त्रोद्योग आणि कपडे, चामडे आणि पादत्राणे, प्लास्टिक आणि रबर, सेंद्रिय रसायने, गृहसजावट, जेनेरिक औषधी, रत्ने आणि हिरे (शुल्क शून्य होईल).

भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे पूर्ण होणार संरक्षण

पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले की, हा करार करताना भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे पूर्ण रक्षण करण्यात आले आहे. मका, गहू, तांदूळ, सोया, कुक्कुटपालन, दूध, पनीर, इथेनॉल आणि तंबाखू यांसारख्या संवेदनशील कृषी उत्पादनांना या सवलतींमधून बाहेर ठेवून पूर्णपणे संरक्षित केले आहे.

'मेक इन इंडिया'ला मिळणार बळ
हा अंतरिम व्यापार करार शेतकरी आणि उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण करून 'मेक इन इंडिया' मोहिमेला बळ देईल आणि महिला व तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अमेरिकेच्या शुल्कात झालेल्या मोठ्या कपातीमुळे भारतीय निर्यातदार, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी आणि मच्छीमारांसाठी ३० हजार अब्ज अमेरिकी डॉलरची अवाढव्य बाजारपेठ खुली होईल. - पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

Web Title : भारत के लिए अमेरिकी बाजार खुला: व्यापार समझौते के फायदे।

Web Summary : भारत और अमेरिका व्यापार समझौते पर सहमत, वस्तुओं पर शुल्क में कटौती। भारत ऊर्जा, विमान और धातु खरीदेगा। कपड़ा, फार्मा और हस्तशिल्प को फायदा। किसान सुरक्षित।

Web Title : US market opens for India: Trade deal benefits explained.

Web Summary : India and US agree on trade deal, cutting tariffs on goods. India will buy energy, planes and metals. Textile, pharma, and handicrafts benefit. Farmers protected.