वर्गात गैरहजर तर कायमचा विसरा अमेरिकेचा व्हिसा; अमेरिकन दूतावासाचा भारतीय विद्यार्थ्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 08:23 IST2025-05-28T08:22:42+5:302025-05-28T08:23:13+5:30
पुन्हा कधीही अमेरिकन व्हिसा मिळणार नाही, असा इशारा भारतातील अमेरिकन दूतावासाने दिला

वर्गात गैरहजर तर कायमचा विसरा अमेरिकेचा व्हिसा; अमेरिकन दूतावासाचा भारतीय विद्यार्थ्यांना इशारा
नवी दिल्ली : अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी जर विद्यापीठाला किंवा संस्थेला माहिती न घेता शिक्षण सोडले, वर्गात उपस्थित राहिले नाहीत किंवा अभ्यास कार्यक्रम सोडला तर त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात येईल. यामुळे त्याला पुन्हा कधीही अमेरिकन व्हिसा मिळणार नाही, असा इशारा भारतातील अमेरिकन दूतावासाने दिला आहे.
‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये, दूतावासाने विद्यार्थ्यांना व्हिसाच्या अटींचे पालन करण्याचे आणि भविष्यात संकट येऊ नये यासाठी विद्यार्थी म्हणून राहण्याचे आवाहन केले. जर तुम्ही तुमच्या संस्थेला कळवल्याशिवाय शिक्षण सोडले, वर्गांना उपस्थित राहिले नाही किंवा अभ्यास कार्यक्रम सोडला तर तुमचा विद्यार्थी व्हिसा रद्द केला जाऊ शकतो आणि भविष्यातील अमेरिकन व्हिसासाठी तुम्ही पात्रता गमावू शकता. कोणत्याही समस्या टाळण्यासाठी नेहमी तुमच्या व्हिसाच्या अटींचे पालन करा आणि तुमचा विद्यार्थी दर्जा कायम ठेवा, असे आवाहन दूतावासाने केले आहे.
अलीकडेच अमेरिकेने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
हार्वर्डचे ८३५ कोटींचे करार रोखले
ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाशी असलेले ८३५ कोटी रुपयांचे करार रोखत नव्याने आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने यापूर्वीच २१,७०० कोटी रुपयांहून अधिकचे संशोधन अनुदान थांबविले आहे.
ही कारवाई विद्यापीठाच्या धोरणांत बदल करण्याच्या प्रशासनाच्या मागण्यांना हार्वर्डने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या धोरणांमध्ये बदल करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनांवर हार्वर्डने २१ एप्रिल रोजी खटला दाखल केला. तेव्हापासून प्रशासनाने विद्यापीठाच्या निधीत कपात सुरू केली आहे.
सध्या अमेरिकेत सर्वाधिक भारतीय विद्यार्थी
अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी प्रवेश घेतात. भारतातील अमेरिकन वाणिज्य दूतावासाने २०२३ मध्ये १,४०,००० हून अधिक विद्यार्थी व्हिसा जारी केले. हे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त होते आणि या संदर्भात विक्रम प्रस्थापित करण्याचे हे सलग तिसरे वर्ष होते. त्याचवर्षी, भारतातील अमेरिकन मिशनने विक्रमी १४ लाख व्हिसा जारी केले आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि गोंधळ
भारतीय आणि इतर परदेशी विद्यार्थ्यांनाही भीती वाटतेय की, अमेरिकन सरकार ओपीटी कार्यक्रम बंद करत आहे.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. सध्या तरी विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.