पोलिसांनी भारतीयावर केलेल्या हल्ल्याची अमेरिकी संसद सदस्यांकडून निर्भर्त्सना
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
वॉशिंग्टन : भारतीयावर पोलिसांनी केलेल्या हिंसक हल्ल्याचा अमेरिकेतील संसद सदस्यांनी निषेध केला आहे. ही घटना भयंकर आणि दु:खद असून दक्षिण आशियाई नागरिकांविरुद्धचा हिंसाचार चिंतेचा विषय आहे, असेही या सदस्यांनी सांगितले.
पोलिसांनी भारतीयावर केलेल्या हल्ल्याची अमेरिकी संसद सदस्यांकडून निर्भर्त्सना
वॉशिंग्टन : भारतीयावर पोलिसांनी केलेल्या हिंसक हल्ल्याचा अमेरिकेतील संसद सदस्यांनी निषेध केला आहे. ही घटना भयंकर आणि दु:खद असून दक्षिण आशियाई नागरिकांविरुद्धचा हिंसाचार चिंतेचा विषय आहे, असेही या सदस्यांनी सांगितले. पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे सुरेशभाई पटेल आंशिक लकवाग्रस्त झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारत व भारतीय अमेरिकींच्या कॉकसचे (काँग्रेसमधील गट) सह अध्यक्ष ॲमी बेरा म्हणाले की, कुटुंबाला भेटण्यासाठी अमेरिकेत आलेले भारतीय नागरिक पोलिसांच्या हल्ल्यामुळे अंशत: लकवाग्रस्त होण्याची घटना भयंकर आणि दु:खद आहे. बेरा हे विद्यमान काँग्रेसमधील एकमेव भारतीय-अमेरिकी सदस्य आहेत. ते म्हणाले की, अधिकार्यांनी याबाबत तातडीने पावले उचलली, तसेच एफबीआयने त्वरित चौकशी सुरू केली याचा मला आनंद आहे. या घटनेवर चिंता व्यक्त करताना काँग्रेस सदस्य ग्रेस मेंग म्हणाले की, अलबामाच्या मेडिसनमध्ये झालेली घटना क्लेषदायक आहे. या प्रकरणी पुढे काय होते यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवू. सुरेशभाई पटेल यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी आम्ही प्रार्थना करतो. मुस्लिम समुदाय व दक्षिण आशियाई समुदायासोबत होणार्या अशा प्रकारच्या घटना चिंतेचा विषय आहे, असेही ते म्हणाले. ग्रेस म्हणाले की, आमच्या समाजात कोणाचाही द्वेष केला जाऊ नये. कट्टरवादाविरुद्ध आवाज उठविण्याची प्रत्येक अमेरिकी नागरिकाची जबाबदारी आहे. आम्हाला अशा प्रकारचा हिंसाचार पूर्णपणे संपुष्टात होईपर्यंत असहिष्णुतेविरुद्ध लढाई सुरू ठेवायला हवी.