Sanjay Dharaiya : जिद्दीला सलाम! ६ वर्षे कॅन्सरशी झुंज, ४ सर्जरी, पॅरालिसिस... शेतकऱ्याच्या लेकाची उत्तुंग भरारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:06 IST2026-03-11T19:06:10+5:302026-03-11T19:06:34+5:30
Sanjay Dharaiya : सलग ६ वर्षे कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी लढा, पॅरालिसिसचा त्रास आणि ४ मोठ्या सर्जरी अशा अनेक संकटांनंतरही संजय यांनी हार मानली नाही.

Sanjay Dharaiya : जिद्दीला सलाम! ६ वर्षे कॅन्सरशी झुंज, ४ सर्जरी, पॅरालिसिस... शेतकऱ्याच्या लेकाची उत्तुंग भरारी
छत्तीसगडच्या संजय डहरिया यांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. सलग ६ वर्षे कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी लढा, पॅरालिसिसचा त्रास आणि ४ मोठ्या सर्जरी अशा अनेक संकटांनंतरही संजय यांनी हार मानली नाही. आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक राहून वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली. त्यांची ही यशोगाथा अशा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, जे आव्हानांसमोर खचून न जाता चिकाटी आणि धैर्याने स्वप्न पूर्ण करू इच्छितात.
एका मुलाखतीत संजय यांनी सांगितलं की, ते छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील बेलटुकरी गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील शेती करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांच्या आई-वडिलांनी शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले. संजय यांचे प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाले. याच काळात त्यांनी पहिल्यांदा एका IAS अधिकाऱ्याला पाहिलं आणि त्याच क्षणी आपणही प्रशासकीय सेवेत जायचं असा निश्चय केला.
नोकरी करण्याचा निर्णय
कौटुंबिक परिस्थिती पाहता त्यांनी आधी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. संजय यांनी १२ वीनंतर शाळेत शिक्षक म्हणून शिकवण्यास सुरुवात केली आणि सोबतच स्वतःचं शिक्षणही सुरू ठेवलं. पुढे त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडिया पोस्टसह अनेक सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) सरकारी नोकऱ्या केल्या. प्रत्येक नोकरीमध्ये त्यांना अभ्यासासाठी सहा ते सात तास मिळत असत.
कॅन्सर आणि ४ मोठ्या सर्जरी
नोकरी आणि अभ्यास करत असताना संजय यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं. २०१२ मध्ये त्यांना कॅन्सरचं निदान झालं. या काळात त्यांना पॅरालिसिसचा त्रास सहन करावा लागला. २०१३ ते २०१५ या कालावधीत त्यांच्या ४ मोठ्या सर्जरी झाल्या. या गंभीर आजारातून ते सावरले, पण पुढची काही वर्षे नियमित तपासणी आणि वैद्यकीय उपचारामध्ये गेली. आजारपण आणि इतर आव्हानं असूनही त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं.
पहिल्या प्रयत्नात अपयश
संजय यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली होती, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी रायपूरमध्ये पूर्ण वेळ देऊन तयारी सुरू केली. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि UPSC परीक्षा २०२५ च्या निकालात त्यांनी ९४६ वी रँक मिळवून इतिहास घडवला. ही गोष्ट केवळ एका परीक्षेतील यशाची नाही, तर जीवनातील प्रत्येक लढाई जिंकण्याची आहे, जी हजारो तरुणांना प्रेरणा देत राहील.