UP Politics: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे खासदार निशिकांत दुबे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये दुबे यांना विचारण्यात आले की, येत्या २० वर्षांत योगी आदित्यनाथ तुम्हाला कुठे दिसतात? यावर दुबे म्हणाले की, 'पुढील २०-२५ वर्षांनंतर परिस्थिती काय असेल, हे कोणालाही माहिती नाही.'
दिल्लीत जागा नाही...
दुबे पुढे म्हणतात, 'योगी आदित्यनाथ आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीतील जागाही पुढील २०-२५ वर्षे रिकामी नाही. पुढे परिस्थिती काय असेल, हे कोणालाही माहिती नाही? राजकारणात २० वर्षे हा मोठा काळ आहे. २०१७ मध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले, तेव्हा उत्तर प्रदेशातील मतदारांनी त्यांच्या नावावर नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मतदान केले होते. आजही जनता फक्त पंतप्रधान मोदींनाच मतदान करते.'
आज जनता योगी आदित्यनाथ यांना पसंत करत आहे का? असे विचारले असता, दुबे म्हणाले की, 'अनेक लोकांना पसंत केले जाते. हिमंता बिस्वा शर्मा (मुख्यमंत्री, आसाम) यांनाही पसंत केले जाते. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांनाही पसंत केले जाते,' असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
अमित शाहांबद्दल काय म्हणाले?
'गृहमंत्री अमित शाहांना किती पसंत केले जाते, ते अकल्पनीय आहे. अमित शाहांनी ३७०, ३५अ, नक्षलवाद यासारखे मुद्दे हाताळले. भारतीय जनता पक्ष इतका मोठा राजकीय पक्ष बनला आहे. याचे सर्व श्रेय त्या काळातील आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना जाते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते (गृहमंत्री अमित शहा) प्रभारी होते. आमचा पक्ष असा आहे की, ज्यात प्रतिभेची कमतरता नाही. प्रत्येकजण प्रतिभावान आहे. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, जोपर्यंत पंतप्रधान मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला त्यांची गरज आहे.'