गरज असेल तिथे गाडी पलटी होणार आणि गोळीही चालणार; CM योगींनी करुन दाखवलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 20:58 IST2023-02-27T20:08:21+5:302023-02-27T20:58:17+5:30
आज आमदार हत्याकांडातील साक्षीदार उमेश पालच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार झाला.

गरज असेल तिथे गाडी पलटी होणार आणि गोळीही चालणार; CM योगींनी करुन दाखवलं...
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेत शनिवार(25 फेब्रुवारी) रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे रौद्र रुप पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी त्यांना राज्यातील गुन्हेगारीवर बोलण्यास प्रवृत्त केले. त्यांनी उमेश पाल खून प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. प्रत्युत्तर म्हणून योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा खरपून समाचार घेतला. 'माफिया कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना जमीनदोस्त केले जाईल,' असे योगींनी ठणकावून सांगितले. त्याच्या अवघ्या दोन दिवसांनीच या विधानाचे कृतीत रुपांतर झाले.
आज उमेश पालच्या हत्येतील एका आरोपीचा चकमकीत मृत्यू झाला आहे. याद्वारे सरकारे पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे की, राज्यात गुंड आणि माफियांविरोधात 'झिरो टॉलरन्स' पॉलिसी असेल. विशेष म्हणजे, यूपीमध्ये 'योगीराज' सुरू झाल्यापासून गुंड आणि माफियांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. तुम्ही आकडे बघितले तर योगी सरकारमध्ये मार्च 2017 ते गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत, सुमारे 170 गुन्हेगार मारले गेले आहेत. तसेच, 4500 हून अधिक गुन्हेगार पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत.
गरज पडली तर गाडीही पलटी होईल आणि गोळीही चालेल, असे योगी सार्वजनिक मंचांवर सांगत असतात. बाईकेरूच्या घटनेनंतर मुख्य आरोपी विकास दुबे याचे वाहन उलटून चकमकीत तो ठार झाला. त्याच संदर्भात योगी यांनी हे वक्तव्य केले होते. वाराणसीत तैनात असलेले उपनिरीक्षक अजय यादव यांची गोळ्या झाडून हत्या करून त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर लुटण्यात आली तेव्हाही पोलिसांनी आक्रमक वृत्ती दाखवली. पिस्तुल लुटणारे हे हल्लेखोर ऑपरेशन पाताल लोक अंतर्गत चकमकीत मारले गेले. वाराणसीमध्ये बिहारमधील कुख्यात मनीष आणि रजनीश यांना चकमकीत मारणाऱ्या पोलिस पथकाला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.