ग्रेटर नोएडा, ज्याला उत्तर प्रदेशची ‘शो-विंडो’ आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखले जाते, तिथेच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे. ग्रेटर नोएडाच्या दनकौर भागातील दलेलगढ गावात, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 3 वर्षीय देवांशचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना केवळ अपघात नसून, यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे घडलेली ‘हत्या’ असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
घटना कशी घडली?
दलेलगढ गावातील रहिवासी अनिल यांची मुलगी अंजली काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. रविवारी गावातील मंदिरात भंडारा होता. अंजली आपल्या दोन्ही मुलांसह भंडाऱ्यात सहभागी झाली होती. याच दरम्यान खेळता-खेळता देवांश मंदिराजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्याकडे गेला. पाय घसरून तो पाण्यात पडला आणि बुडाला. काही वेळ मुलगा सापडला नाही. नंतर शोध सुरू झाला. पोलिस व प्रशासनाने बचावकार्य केले, मात्र तोपर्यंत देवांशचा मृत्यू झाला होता.
ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या
दलेलगढ गावातील मंदिराजवळ खोदलेला हा खड्डा कोणताही नैसर्गिक तलाव नाही. 6 वर्षांपूर्वी मातीसाठी हा 15 ते 20 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. माती विकल्यानंतर हा खड्डा न भरता तसाच सोडण्यात आला. कालांतराने तो पाण्याने भरत गेला, मात्र तो झाकण्याची किंवा कुंपण घालण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. खड्डा भरा किंवा किमान संरक्षक भिंत उभारा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र, फाईली पुढे सरकल्याच नाहीत. जर वेळेत या खड्ड्यावर उपाययोजना झाल्या असत्या, तर आज चिमुकला देवांश जिवंत असता.
4 जानेवारी 2026 रोजीच दिली होती तक्रार
महत्त्वाची बाब म्हणजे, 4 जानेवारी 2026 रोजीच दलेलगढ ग्राम विकास समितीच्या अध्यक्षांनी गावातील उघडे खड्डे भरणे आणि रस्त्यालगत साचलेले पाणी काढण्याबाबत अधिकृत तक्रार दिली होती. तक्रारीनंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने 14 फेब्रुवारी 2026 रोजी ही दुर्घटना घडली.
प्राधिकरणाचा खुलासा: सरकारी तलाव नाही
या घटनेवर ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने निवेदन जारी केले आहे. प्राधिकरणानुसार, मंदिराजवळील हा खड्डा सरकारी तलाव नसून, गावातील एका शेतकऱ्याच्या नावावर नोंद असलेल्या खासगी जमिनीवर आहे. या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून देवांशचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली आहे.
आधी युवराज, आता देवांश...पॅटर्न कायम
दरम्यान, ग्रेटर नोएडामध्ये ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच सेक्टर 150 मध्ये युवराज नावाच्या चिमुकल्याचा अशाच उघड्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. तेव्हा चौकशी, कारवाई आणि सुरक्षित शहराची आश्वासने देण्यात आली होती. मात्र, आज दलेलगढमधील ही घटना त्या आश्वासनांचा पोकळपणा उघड करते. नावे बदलतात, ठिकाणे बदलतात, पण निष्काळजीपणाचा पॅटर्न मात्र बदलत नाही, असा संताप व्यक्त होत आहे.
Web Summary : A three-year-old boy, Devansh, died after falling into an uncovered pit in Greater Noida. Villagers had repeatedly complained about the dangerous pit, but no action was taken. This incident highlights ongoing negligence despite previous similar tragedies.
Web Summary : ग्रेटर नोएडा में एक तीन वर्षीय देवांश की खुले गड्ढे में गिरने से मौत हो गई। ग्रामीणों ने बार-बार खतरनाक गड्ढे की शिकायत की, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। यह घटना पहले हुई समान त्रासदियों के बावजूद लगातार लापरवाही को उजागर करती है।