नशेत तरुणाने गिळले २९ स्टीलचे चमचे, १९ टूथब्रश; ५ तासांची शस्त्रक्रिया करून पोटातून काढल्या ५० वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:36 IST2025-09-25T20:32:45+5:302025-09-25T20:36:12+5:30
उत्तर प्रदेशात एका रुग्णाच्या पोटातून टूथब्रश, चमचा आणि पेन या गोष्टी काढण्यात आल्या.

नशेत तरुणाने गिळले २९ स्टीलचे चमचे, १९ टूथब्रश; ५ तासांची शस्त्रक्रिया करून पोटातून काढल्या ५० वस्तू
UP Doctor: उत्तर प्रदेशातून एक विचित्र घटना समोर आली आहे. पोटातून केसांचे गुच्छ, कात्री आणि ब्लेड काढण्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण यावेळी उत्तर प्रदेशात विचित्र प्रकार समोर आला. पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या एका तरुणाचा एक्स-रे काढला तेव्हा त्याच्या पोटात काही भलत्याच गोष्टी आढळल्या. डॉक्टरांनी ऑपरेशन सुरू केले आणि काही तासांतच तरुणाच्या पोटातून धक्कादायक गोष्टी मिळाल्या.
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातून एका ४० वर्षीय व्यक्तीने स्टीलचा चमचा, टूथब्रश आणि पेन गिळून टाकल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. त्याला पोटात असह्य वेदना होत होत्या. या तरुणाला अंमली पदार्थांचे इतके व्यसन लागले होते की तो सर्व प्रकारचे पदार्थ खाऊ लागला. कधी तो पेन खात असे तर कधी टूथब्रश आणि चमचा खात असे. तो अंमली पदार्थाच्या व्यसनावर उपचार घेत होता. अचानक एके दिवशी त्याला पोटदुखीचा त्रास झाला तेव्हा तो एका खाजगी रुग्णालयात गेला. सर्व तपासणी प्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याचे यशस्वी ऑपरेशन केले.
डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेतून तरुणाच्या पोटातून दोन पेन, १९ टूथब्रश, २९ चमचे काढण्यात आले आणि त्याचा जीव वाचला. देवनंदानी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, बुलंदशहरच्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असलेला सचिन पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आला होता. सचिनला ताबडतोब दाखल करण्यात आले. एक्स-रे केल्यानंतर डॉक्टरांना त्याच्या पोटात काही असामान्य वस्तू आढळल्या. रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. श्याम कुमार आणि डॉ. संजय राय यांनी शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेदरम्यान आम्हाला दोन पेन, १९ टूथब्रश आणि २९ चमचे सापडले आणि रुग्ण वाचला. प्राथमिक तपासात सचिनने व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असताना नशेत असताना या वस्तू गिळल्या होत्या. पाच तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर, डॉ. श्याम कुमार यांच्यासह पाच जणांच्या पथकाने सर्व वस्तू काढल्या. डॉक्टरांनी २३ सप्टेंबर रोजी त्याला डिस्चार्ज दिला. डॉक्टरांनी सचिनला मानसिक आजार असल्याचे सांगितले. हे प्रकरण ट्रायकोटिलोमॅनिया किंवा पिका डिसऑर्डरशी संबंधित असू शकते, या गंभीर मानसिक विकारामध्ये एखादी व्यक्ती वस्तू गिळते.