जीव वाचवण्यापेक्षा VIDEO महत्त्वाचा...; बेशुद्ध हवालदाराला रुग्णालयात नेण्याऐवजी अधिकाऱ्याने काढला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 03:00 PM2024-06-19T15:00:59+5:302024-06-19T15:06:33+5:30

कानपूरमध्ये उष्माघाताने एक हवालदार बेशुद्ध झाल्यानंतर मृत्यू झाला. मात्र त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली.

UP head constable fainted and died the inspector kept making the video | जीव वाचवण्यापेक्षा VIDEO महत्त्वाचा...; बेशुद्ध हवालदाराला रुग्णालयात नेण्याऐवजी अधिकाऱ्याने काढला व्हिडीओ

जीव वाचवण्यापेक्षा VIDEO महत्त्वाचा...; बेशुद्ध हवालदाराला रुग्णालयात नेण्याऐवजी अधिकाऱ्याने काढला व्हिडीओ

Kanpur Police : देशातील उत्तरेकडील भागात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. उष्माघातामुळे आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी लोक चक्कर येऊन रस्त्यावर पडत आहेत. अशातच उष्णतेच्या लाटेमुळे एका पोलीस हवालदारालाही जीव गमवावा लागल्याचे कानपूरमधूनही समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हवालदाराला उष्माघाताचा त्रास होत असताना त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याचा वरिष्ठ अधिकारी मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होता. या हवालदाराला नंतर आपला जीव गमवावा लागला. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कानपुरच्या एका पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस हवालदाराचा उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाला. पोलीस हवालदाराला ऊनामुळे चक्कर आली तेव्हा पोलीस ठाण्याचे निरीक्षकही त्यांच्यासोबत होते. त्यांनी पोलीस हवालदाराला रुग्णालयात नेण्यापूर्वी व्हिडिओग्राफी सुरू केली. त्यानंतर हवालदाराला उपचारासाठी रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाला होता. हा सगळा प्रकार आता सोशल मीडियातून समोर आल्यानंतर रोष व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झाशीचे रहिवासी असलेले पोलीस हवालदारा ब्रिज किशोर सिंह हे तीन दिवसांची सुट्टी घेऊन मंगळवारी सकाळी आपल्या घरी जात होते. मात्र त्यावेळी ब्रिज किशोर यांना चक्कर आल्याने ते पोलीस ठाण्याबाहेरच जमिनीवर पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिज किशोर यांना उचलून एका खुर्चीत बसवले. यानतंर तिथे तैनात असलेला पोलीस निरीक्षक तिथे आला आणि त्याने व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. ब्रिज किशोर यांची प्रकृती बिघडत असतानाही पोलीस निरीक्षक व्हिडीओ काढत होता. महत्त्वाचे काम असताना मोबाईल चालत नाही, असेही तो पोलीस निरीक्षक व्हिडीओमध्ये म्हणत होता.

काही वेळाने ब्रिज किशोर यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हवालदार ब्रिज किशोर यांना तात्काळ रुग्णालयात का नेण्यात आले नाही आणि त्याची व्हिडिओग्राफी का सुरू ठेवली, असा सवाल विचारला जात आहे. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले.

कानपूरचे पोलीस अधीक्षक मोहसीन खान यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "पोलीस हवालदार ब्रिज किशोर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लवकरच त्ंयाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येईल. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असे प्राथमिक अंदाज आहे. उर्वरित मुख्य कारणे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत. या प्रकरणात पोलीस निरीक्षकाने व्हिडीओ काढल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाईल," असे पोलीस अधीक्षक मोहसीन खान यांनी म्हटलं.
 

Web Title: UP head constable fainted and died the inspector kept making the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.