UP Election Result 2022: उत्तर प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत, शायर मुनव्वर राणा यांची तब्येत बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 13:02 IST2022-03-10T13:02:47+5:302022-03-10T13:02:53+5:30
UP Election Result 2022: उत्तर प्रदेशात भाजप सत्तेत आल्यास राज्यातून निघून जाईन, अशी घोषणा मुनव्वर राणा यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत, शायर मुनव्वर राणा यांची तब्येत बिघडली
लखनौ: उत्तर प्रदेशात भाजपाच विजय झाला, तर राज्यातून निघून जाईल, अशी घोषणा करणारे प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांची प्रकृती खालावली आहे. यूपी निवडणुकीच्या निकालापूर्वीच मुनव्वर राणा आजारी पडले आहेत. आजच्या निकालानंतर भाजपला मोठा विजय मिळाल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुनव्वर राणा आपल्या वक्तव्याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत.
तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने ते घरीच उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. युपीमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्याचे दिसत असल्याने मुनव्वर राणा आपल्या आश्वासनावर ठाम राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पत्रकारांना काहीही बोलण्यास नकार दिला. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास उत्तर प्रदेश सोडेन, असे वक्तव्य त्यांनी यापूर्वी जाहीरपणे केले होते.
काय म्हणाल मुनव्वर राणा?
प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा म्हणाले होते की, 'मागील पाच वर्षांत आम्ही वाचलो, पण येत्या पाच वर्षांत योगी आले तर आम्ही वाचणार नाही. मृत्यू कुणाला चुकणार नाही, पण वाईट पद्धतीने मरायचे नाही,'असे वक्तव्य राणा यांनी केले होते. दरम्यान, आत्तापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. भाजप सध्या 270 जागांवर आघाडीवर आहे, तर समाजवादी पक्ष 128 जागांवर आघाडीवर आहे. गेल्यावेळेप्रमाणे यावेळीही काँग्रेस आणि बसपाची अवस्था बिकट आहे. दुसरीकडे, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सपा प्रमुख अखिलेश यादव, जे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत, ते दोघेही आपापल्या जागेवरून आघाडीवर आहेत.