राजकारण माझ्यासाठी पूर्णवेळ नोकरी नाही; मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेदरम्यान योगींचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:10 IST2025-04-01T16:08:18+5:302025-04-01T16:10:01+5:30
संजय राऊत यांच्या दाव्यानंतर पीएम मोदींच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे.

राजकारण माझ्यासाठी पूर्णवेळ नोकरी नाही; मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेदरम्यान योगींचे सूचक वक्तव्य
UP CM Yogi adityanath : गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान मोदींचा वारस किंवा पंतप्रधानपदाचा पुढील उमेदवार म्हणून पाहिले जाते. आता स्वतः योगींनी पंतप्रधानपदाची उमेदवारी आणि त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर महत्वाचे भाष्य केले आहे. 'मी राजकारणाला पूर्णवेळ नोकरी मानत नाही,' असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी त्यांची राजकीय महत्वकांशा, भाजपमधील उत्तराधिकारी आणि उत्तर प्रदेशची स्थिती याबद्दल दीर्घ संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांना विचारण्यात आलेला एक प्रश्न खूपच रोचक आहे. योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आले की, 'RSS ला तुम्ही आवडता, नरेंद्र मोदींना आवडता, या देशातील एका मोठ्या वर्गाला तुम्हाला एक ना एक दिवस पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे. यावर तुमचे मत काय ?
VIDEO | EXCLUSIVE: Here's what Uttar Pradesh CM Yogi Adityanath (@myogiadityanath) said responding to a question regarding a large section of people wanting to see him as the Prime Minister someday:
— Press Trust of India (@PTI_News) April 1, 2025
"Look, I am the Chief Minister of the state, the party has put me here for the… pic.twitter.com/kTacrrfdaI
या प्रश्नाचे उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'मी राजकारणाला पूर्णवेळ व्यवसाय/नोकरी मानत नाहीत. मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आहे, पक्षाने मला उत्तर प्रदेशच्या लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. राजकारण माझ्यासाठी पूर्णवेळ काम नाही. सध्या मी हे काम करतोय, पण मी प्रत्यक्षात योगी आहे. जोपर्यंत या पदावर असेन, तोपर्यंत राज्यातील जनतेची सेवा करेल. पण, यासाठीही काही कालमर्यादा आहे,' असे योगी म्हणाले.
योगी आदित्यनाथांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकारीबाबत चर्चा जोर धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूर येथील RSS मुख्यालयाला भेट दिली. यानंतर विरोधी पक्षांनी मोदींच्या निवृत्तीची चर्चा सुरू केली.
संजय राऊतांच्या टिप्पणीने चर्चा सुरू
शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी दावा केला की, नरेंद्र मोदी निवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी संघ मुख्यालयात गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व बदल हवा आहे. आता संघच पुढचा पंतप्रधान निवडणार असून, तो महाराष्ट्राचाच असेल, असा दावा राऊतांनी केला. मोदींच्या वयाचे कारण देत राऊत म्हणाले की, भाजपमध्ये 75 हे निवृत्तीचे वय आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याचे पालन केले आहे. पीएम मोदी सध्या तिसऱ्या कार्यकाळात आहेत आणि या सप्टेंबरमध्ये ते 75 वर्षांचे होणार आहेत. संजय राऊतांच्या या वक्तव्याने मोदींच्या नवृत्तीची चर्चा सुरू झाली.
मात्र, भाजप आणि आरएसएस या दोघांनी अशी कोणतीही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर 2029 मध्ये मोदीजींना पुन्हा पंतप्रधान म्हणून पाहणार असल्याचे सांगितले.