उत्तर प्रदेशमध्ये २०२७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, नव्या वर्षात उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मकर संक्रांतीनंतर, १४ जानेवारीनंतर हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडू शकतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील अनुभवानंतर, २०२७ मध्ये कोणतीही कसर न सोडण्यासाठी भाजप 'सोशल इंजिनिअरिंग'वर भर देत आहे. यामध्ये ओबीसी आणि दलित समाजातील नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन विरोधकांच्या 'PDA' (पिछडा, दलित, अल्पसंख्याक) फॉर्म्युलाला उत्तर देण्याची रणनीती आखली जात आहे.
उत्तर प्रदेश भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी नुकतीच योगी यांची भेट घेतली. यानंतर या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री निवासस्थानी नुकत्याच पार पडलेल्या कोर कमिटीच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
तिसरा उपमुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, जातीय संतुलन साधण्यासाठी यूपीला तिसरा उपमुख्यमंत्री मिळू शकतो. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
६ रिक्त पदांवर कोणाची लागणार वर्णी?योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सध्या ५४ मंत्री कार्यरत आहेत. नियमांनुसार, उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात कमाल ६० मंत्री असू शकतात. याचाच अर्थ सध्या ६ पदे रिक्त आहेत. कामगिरीच्या जोरावर काही विद्यमान मंत्र्यांना वगळले जाऊ शकते. तर काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. रिक्त मंत्रिपदे भरण्यासाठी ही धावपळ सुरू आहे.
कोणाला मिळणार संधी...
भूपेंद्र सिंह चौधरी: माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट मतांना आकर्षित करण्यासाठी त्यांना पुन्हा कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे स्थान दिले जाऊ शकते.
मनोज पांडे (SP बागी): समाजवादी पक्षातून बंडखोरी करून भाजपला मदत करणारे मनोज पांडे यांना ब्राह्मण चेहरा म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
पूजा पाल: सपाच्या माजी आमदार पूजा पाल यांचे नावही चर्चेत असून, त्या मागासवर्गीय मतांचे प्रतिनिधित्व करू शकतात.
पंकज सिंह: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सुपुत्र आणि नोएडाचे आमदार पंकज सिंह यांनाही मंत्रिपद देऊन युवा नेतृत्वाला वाव देण्याची चिन्हे आहेत.
महेंद्र सिंह: जुन्या अनुभवी मंत्र्यांपैकी महेंद्र सिंह यांचे पुन्हा पुनरागमन होऊ शकते.
मित्र पक्ष: 'अपना दल' आणि 'आरएलडी' (RLD) यांच्या कोट्यातून प्रत्येकी एका राज्यमंत्र्याची भर पडण्याची शक्यता आहे.
Web Summary : Ahead of the 2027 elections, Yogi Adityanath is likely to reshuffle his cabinet post- Makar Sankranti. The expansion aims to include OBC and Dalit leaders, countering opposition strategies and filling six vacant positions. Veteran leaders and alliance partners may gain representation.
Web Summary : 2027 के चुनावों से पहले, योगी आदित्यनाथ मकर संक्रांति के बाद अपने मंत्रिमंडल में फेरबदल कर सकते हैं। विस्तार का उद्देश्य ओबीसी और दलित नेताओं को शामिल करना, विपक्षी रणनीतियों का मुकाबला करना और छह खाली पदों को भरना है। अनुभवी नेताओं और गठबंधन सहयोगियों को प्रतिनिधित्व मिल सकता है।